पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. तेव्हापासून पंतप्रधानांनी जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. सत्तेत आल्यापासून त्यांनी जगभरातील अनेक नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवेल आहेत. तसंच, आंतरदेशीय व्यवहारांना चालना दिली. अनेक जागतिक दर्जाचे कार्यक्रम भारतात आयोजित करून त्यांनी जगभरातील नेत्यांना भारतात आणलं. तसंच, युद्ध, करोनासारख्या आपत्कालीन परिस्थितीतही भारताने संबंधित देशाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा आलेख दिवसेंदवस उंचावत गेला. आता आणखी एक सर्वेक्षण समोर आलं असून त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदीच जगभरात सर्वांत लोकप्रिय नेते असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मॉर्निंग कन्सल्ट सर्वेक्षणातून ही बाब समोर आली असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

मॉर्निंग कन्सल्टने ३० जानेवरी ते ५ फेब्रुवारी दरम्यान डेटा गोळा केला. यामध्ये सर्वेक्षण केलेल्या देशातील प्रौढांची मते विचारात घेतली. या सर्वेक्षणानुसार, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकप्रियतेत ७८ टक्के मिळाले आहेत. तर, मेक्सिकोचे आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांना ६४ टक्के, स्वित्झर्लंडचे एलेन बर्सेट ५७ टक्के रेटिंगसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

हेही वाचा >> “अमूल जैसा कोई नहीं!”, गुजरातमध्ये नरेंद्र मोदींचं विधान चर्चेत, तर आव्हाडांचा ‘महानंद’बाबत मोठा दावा!

पोलांडचे डोनाल्ड टस्क ५० टक्क्यांसह चौथ्या स्थानावर असून ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला डी सिल्वा ४७ टक्के रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहेत. तसंच, ऑस्ट्रेलिआचे अँथनी अल्बानीज यांना ४५ टक्के रेटिंग्स मिळाले आहेत.

बायडेन आणि सुनक यांची लोकप्रियता किती?

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ हे सर्वांत शक्तीशाली नेते मानले जातात. परंतु, या सर्वेक्षणात यांचा क्रमांक मध्यभागी किंवा तळाशी आहे. बायडेन यांना ३७ टक्के रेटिंग मिळाले असून सुनक आणि ओलाफ याना फक्त २० टक्के लोकांनी रेटिंग दिली.

मॉर्निंग कन्सल्ट ही एक जागतिक दर्जाची बिझनेस इंटेलिजन्स कंपनी आहे. या संस्थेकडून सतत जगातील प्रमुख देशांतील नेत्यांच्या लोकप्रियतेचा आढावा घेतला जातो. प्रत्येक काळातील सर्वांत हुशार आणि सर्वोत्तम निर्णय घेणाऱ्या नेत्यांचा डेटा या माध्यमातून गोळा केला जातो.