BJP leader Raghvendra Pratap Singh Hindu-Muslim Remark in Uttar Pradesh : “जो हिंदू तरुण मुस्लीम तरुणीला घेऊन येईल, मी त्याच्या नोकरीची तजवीज करेन”, असं आवाहन करणारे भाजपा नेते राघवेंद्र प्रताप सिंग यांना पक्षाने सुनावल्यानंतरही ते आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. पक्षाने राघवेंद्र सिंग यांच्या वक्तव्यापासून आंतर राखलं आहे. यावर ते म्हणाले, “माझ्या मतदारसंघातील लोकांना असा संदेश देणं आवश्यक आहे. कारण माझ्या मतदारसंघात मुस्लीम बहुसंख्य आहेत.”

डोमरीयागंज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राघवेंद्र प्रताप सिंग यांचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते सिद्धार्थनगर जिल्ह्यातील तरुणांना कमीत कमी १० मुस्लीम मुली आणायला सांगत आहेत. ते म्हणाले, “कमीत कमी १० मुस्लीम मुली उचलून आणा, त्यानंतर तुमच्या नोकरीची, संसाराची जबाबदारी माझी. जो मुस्लीम मुलीला घेऊन येईल त्याला नोकरी दिली जाईल. त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आम्ही सोडवू.”

मायावतींचा संताप

राघवेंद्र सिंग यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी राघवेंद्र सिंग यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आणि त्यांनी भाजपा नेतृत्वाकडे कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मायावती म्हणाल्या, “मुस्लीम मुलगी आणा आणि नोकरी मिळवा हे संकुचित मनोवृत्तीतून केलेलं वक्तव्य आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि इतर राज्यांमध्ये धर्मांतर, लव्ह जिहाद आणि कथित संकल्पना मांडून धर्माच्या नावाखाली, जातीच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडली जात आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी हा सगळा प्रकार चालू आहे. हे अत्यंत निषेधार्ह आहे.

डिंपल यादव यांची टीका

मायावती म्हणाल्या, “अशा गुन्हेगार, समाजविघातक घटकांनी सभ्य व संवैधानिक सरकारला थेट आव्हान दिलं आहे. अशा लोकांना समर्थन व सुरक्षा देण्याऐवजी त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे.”

दरम्यान, समाजवादी पार्टीच्या खासदार डिंपल यादव म्हणाल्या, “हे अत्यंत बेजबाबदार वक्तव्य आहे. भाजपाचे नेते अशा प्रकारची वक्तव्ये वारंवार करतात. भाजपाचे नेते नेहमी महिलाविरोधात वक्तव्ये करत असतात. यातून पक्षाची व त्यांच्या नेत्यांची मानसिकता दिसून येते.”