पीटीआय, इम्फाळ
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी मणिपूरच्या राज्यपाल अनुसूया उईके यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी राज्यातील घटनाक्रम दु:खद असून राज्य आणि देशासाठी ही परिस्थिती वेदनादायक असल्याचे मत व्यक्त केले. त्याच वेळी ‘हिंसा हा कोणत्याही प्रश्नावर उपाय असू शकत नाही’, असे सांगून त्यांनी राज्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी समाजातील सर्व थरांतील लोकांना आवाहन केले.
राहुल यांनी राज्यातील परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, ‘मला मणिपूरमधील लोकांचे दु:ख समजते. या फार भयानक घटना आहेत. पुढे जाण्यासाठी शांतता हाच मार्ग आहे आणि प्रत्येकाने शांततेबद्दल चर्चा करून त्या दिशेने पावले उचलावीत.’ तसेच राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण कोणत्याही मार्गाने मदत करायला तयार आहोत असे त्यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. या भेटीदरम्यान, राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलली जात आहेत असे आश्वासन राज्यपालांनी दिल्याची माहिती राहुल गांधी यांच्याबरोबर गेलेल्या शिष्टमंडळातील नेत्यांनी दिली.
राज्यपालांना भेटण्यापूर्वी राहुल यांनी चुराचंदपूर आणि मोइरंग येथील मदत छावण्यांना भेट दिली आणि तेथील शरणार्थीशी संवाद साधला. त्यांच्याजवळ स्वत:च्या वेदना सांगताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते. राहुल यांनी यापैकीच एका मदत छावणीमध्ये लहान मुलांबरोबर भोजन केले. या मदत छावण्यांमध्ये सुधारणा करायची गरज आहे असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘मला सरकारला एक गोष्ट सांगायची आहे की, या छावण्यांमधील प्राथमिक सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. अन्नामध्ये सुधारणेची गरज आहे. औषधांचा पुरवठा केला पाहिजे. या प्रकारच्या तक्रारी छावण्यांमध्ये ऐकायला मिळाल्या.’
इम्फाळमध्ये राहुल गांधी यांनी आझाद हिंदू सेनेच्या युद्ध स्मारकाला भेट दिली आणि नेताजी सुभाषचंद्र बोस आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली. या ठिकाणी आझाद हिंदू सेनेच्या शूर स्वातंत्र्यसैनिकांनी १९४४ मध्ये तिरंगा फडकावला होता.