Odisha Vigilance Raid : ओडिशामधील भुवनेश्वरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अपार्टमेंटच्या खिडकीतून ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल खाली पडू लागल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर काही जण नोटा गोळा करण्यासाठी धावले तर काहींनी व्हिडीओ रेकॉर्ड केला. ही घटना गुरुवारी घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेची ओडिशामध्ये मोठी चर्चा रंगली आहे. तसेच एका सरकारी अभियंत्याच्या घरावर छापा टाकल्यानंतर सापडलेल्या २.१ कोटी रुपयांच्या घटनेनंतर प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
ओडिशामध्ये भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सतत कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवरच ओडिशा व्हिजिलन्स विभागाने भुवनेश्वरमधील बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता (रस्ते) बैकुंठ नाथ सारंगी यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. तेव्हा तब्बल २.१ कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली. या अभियंत्यावर बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याच्या आरोप झाला होता, त्यानंतर छापे टाकण्यात आले असता ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.
ओडिशा व्हिजिलन्स विभागाने अभियंता बैकुंठनाथ सारंगी यांच्या निवासस्थानी छापा टाकला. तेव्हा २.१ कोटी रुपयांची रोकड आढळून आली. या घटनेमुळे अधिकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला. अद्यापही त्या ठिकाणी कारवाई सुरू असल्याची माहिती सांगितली जात आहे. दरम्यान, ओडिशा व्हिजिलन्सच्या पथकाने भुवनेश्वर, अंगुल आणि पिपलीसह ७ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत ८ डीएसपी, १२ निरीक्षक, ६ एएसआय आणि इतर अधिकारी सहभागी होते. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
खिडकीतून फेकले ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल
भुवनेश्वरच्या एका अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमधून छाप्यादरम्यान १ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली, तर दुसरीकडे अंगुल येथील एका दुमजली अपार्टमेंटमधून आतापर्यंत १.१ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एवढी मोठी रक्कम जप्त करण्यात आली असून हे पैसे मोजण्यासाठी मशीन मागवण्यात आल्या आहेत.
#WATCH | Bhubaneswar: Odisha Vigilance Department conducted searches at 7 locations of Odisha Rural Works Division Chief Engineer, Baikuntha Nath Sarangi
— ANI (@ANI) May 30, 2025
About Rs 1 crore has been recovered from his flat in Bhubaneswar, while about Rs 1.1 crore has been recovered from his… pic.twitter.com/n8MQxYfU0L
एवढंच नाही तर या कारवाई दरम्यान भुवनेश्वरमधील फ्लॅटमध्ये उपस्थित असलेल्या बैकुंठनाथ सारंगी यांना आपल्या घरावर छापा पडत असल्याची कुणकुण लागताच त्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीतून ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल खाली फेकून दिले. घराच्या खिडकीतून ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल खाली पडत असतानाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, घराच्या खिडकीतून खाली फेकलेल्या नोटांचे बंडल देखील जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई सुरु असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.