Vande Bharat Viral Video : वंदे भारत ट्रेनची कोणत्या न कोणत्या कारणावरून मोठी चर्चा असते. वंदे भारत ट्रेन ही सेमी हायस्पीड ट्रेन आहे. मात्र, असं असूनही या ट्रेनमध्ये मिळणाऱ्या सुविधांवरून अनेकदा टीका होताना पाहायला मिळत आहे. आता वंदे भारतच्या एका ट्रेनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये पावसाच्या पाण्याची गळती वंदे भारत ट्रेनच्या एका डब्ब्यात होत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ एका प्रवाशी विद्यार्थ्याने शेअर केला आहे.
नेमकं काय घडलं?
देशात सेमी-हायस्पीड ट्रेनचे स्वप्न घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा वेगवेगळे अनुभव येत आहेत. आता वाराणसीहून नवी दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या सी ७ या कोचमधून प्रवास करत असताना छतावरून पावसाचं पाणी गळत असल्याचं पाहायला मिळालं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्रेनच्या छतावरून पावसाचं पाणी गळत असल्यामुळे ट्रेनच्या डब्ब्यात पाणीच पाणी पाहायला मिळालं. एवढंच नाही तर पाणी गळत असल्याने प्रवाशाला तेथील काही आसनांवरही बसता येत नसल्याचं दिसून आलं आहे.
या घटनेचा व्हिडीओ दर्शिल नावाच्या एका युवकाने एक्सवर शेअर केला आहे. तसेच सदंर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. वाराणसीहून दिल्लीला सी ७ कोचमधून प्रवास करताना दर्शिलला ट्रेनच्या छतावरून पावसाच्या पाण्याचा सामाना करावा लागला. एवढंच नाही तर या पाण्यामुळे त्याचे टॅब्लेट, ट्राउझर्स आणि इतर काही प्रवाशी भिजल्याचा दावाही त्याने केला आहे. मात्र, तरीही अशा परिस्थितीत दर्शिलने आठ तास प्रवास केला.
— Darshil Mishra (@MishraDarshil) June 23, 2025
दरम्यान, याबाबत दर्शिलने रेल्वे कर्मचाऱ्यांसमोर हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला अॅडजस्ट करा असे उत्तर दिल्याचा दावा दर्शिलने केला आहे. दर्शिलने घटनेचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर भारतीय रेल्वेच्या निष्काळजीपणाबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान,”भारतात आधुनिक रेल्वे प्रवासाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आराम आणि कार्यक्षमतेचे आश्वासन दिले जाते. मात्र, ही घटना रेल्वेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या देखभालीच्या चुका अधोरेखित करत आहे”, असं त्याने म्हटलं आहे.