राज ठाकरे यांना हिंदू शेर म्हणत हनुमानगढीचे महंत राजूदास यांनी राज ठाकरेंचं कौतुक केलं आहे. तसंच त्यांनी अयोध्येला जरुर यावं असंही म्हटलं आहे. महंत राजूदास यांनी गुरुवारी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती आणि बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक केलं होतं. त्यानंतर आता राजूदास महाराज यांनी राज ठाकरेंवर स्तुती सुमनं उधळली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले आहेत महंत राजूदास महाराज?

“राज ठाकरे हे हिंदू शेर आहेत. त्यांना अयोध्येच्या मंदिर उद्घाटानचं निमंत्रण जरुर मिळेल. राज ठाकरेंना मी भेटलो आहे. मीडियासमोरही मी त्यांना भेटलो आहे. राज ठाकरे हिंदू शेर आहेत. त्यांनी अयोध्येला जरुर आलं पाहिजे. जर त्यांना निमंत्रण मिळालं नाही तरीही मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी अयोध्येत नक्की यावं. ते सनातनी वाघ आहेत” असं म्हणत महंत राजूदास महाराज यांनी राज ठाकरेंचं तोंड भरुन कौतुक केलं आहे. आता या आवाहनाचा स्वीकार करुन राज ठाकरे अयोध्येला जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. टीव्ही ९ मराठीशी संवाद साधत असताना महंत राजूदास यांनी राज ठाकरेंचं कौतुक केलंय.

अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची तयारी अत्यंत उत्साहात आणि आनंदात सुरु आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन केलं जाणार आहे. त्यासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. अशात हनुमानगढीचे महंत राजूदास महाराज यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली.

काय म्हटलं होतं महंत राजूदास यांनी?

“मुंबईकरांनी अयोध्येत येऊन मंदिर निर्माण करण्यात मोठा वाटा उचलला. बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं की बाबरीचा ढाचा माझ्या लोकांनी पाडला त्याचा मला अभिमान आहे. असा नेता पुन्हा होणार नाही.” असं राजूदास महाराज म्हणाले.

उद्धव ठाकरेंवर भडकले महंत राजूदास?

मी हे गर्वाने सांगतो मी हिंदू आणि सनातनी आहे. वसुधैव कुटुंबकम ही आमची भावना आहे. आम्ही आजवर कुणाचाही अपमान केलेला नाही. मात्र हिंदू धर्म आणि सनातन धर्म यांच्या विरोधात बोललो की मला नावं ठेवली जातात. पण आज बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा रडत असणार हे नक्की. कारण आत्ता ज्या प्रकारचं राजकारण उद्धव ठाकरेंनी केलं त्या राजकारणाला तिलांजली देण्याचे विचार बाळासाहेबांचे होते. राम विद्रोहींबरोबर मिळालेली सत्ता त्यांनी घेतली नसती. दुर्भाग्य आहे की यांनी सोनिया गांधींचे पाय धरले.” त्यांना निमंत्रणाचा प्रश्न आहे त्याबाबत मी सांगेन रामाला ज्याने नाकारलं, भाजपाचा इव्हेंट आहे म्हटलं त्या उद्धव ठाकरेंची अवस्था काय आहे? त्यांचा पक्ष फुटला, येणारा निधी थांबला, अनेकांना तुरुंगात जावं लागलं. ही सगळी बाब त्यांनी विचारात घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र असून असं वागत आहेत याच्या वेदना होत आहेत. गर्वसे कहो हम हिंदू है हा बाळासाहेबांचा नारा होता. त्याच बाळासाहेबांचे पुत्र रामद्रोहींसह उभे आहेत. अशी टीकाही राजूदास महाराजांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray is like a tiger he has to come ayodhya for ram temple inauguration said mahant rajudas maharaj scj