Sonam Raghuvanshi And Lover Raj Kushwahs Arrest: मध्य प्रदेशातील इंदूरच्या राजा रघुवंशी याची विवाहानंतर मेघालयला हनिमूनसाठी गेल्यावर क्रूर हत्या झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या घटनेनंतर बेपत्ता झालेली त्याची पत्नी सोनम रघुवंशी काल उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील एका ढाब्यावर सापडली. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे. या प्रकरणामध्ये सोनमचा कथित प्रियकर राज कुशवाह याचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचे ११ मे २०२५ रोजी इंदूर येथे लग्न झाले होते. लग्नानंतर नऊ दिवसांनी, २० मे रोजी मेघालयला हनिमूनसाठी गेले होते. सुरुवातीला या जोडप्याने काश्मीरला जाण्याचा विचार केला होता, परंतु दहशतवादी हल्ल्यांच्या बातम्यांनंतर त्यांनी मेघालयातील निसर्गरम्य ठिकाण निवडले.

२२ मे रोजी भाड्याने घेतलेल्या स्कूटरवरून हे जोडपे मावलाखिया गावात पोहोचले होते. त्यांनी त्यांची स्कूटर पार्क केली आणि नोंगरियात गावातील प्रसिद्ध पूल पाहण्यासाठी गेले. तिथे त्यांनी एका होमस्टेमध्ये रात्र घालवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघून गेले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.

२३ मे रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास, हे जोडपे त्यांच्या होमस्टेमधून बाहेर पडले आणि भाड्याने घेतलेल्या स्कूटरने पर्यटनासाठी निघाले. त्यानंतर त्यांचा त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क तुटला. २४ मे रोजी शिलाँग ते सोहरा रस्त्यावर एका कॅफेबाहेर या जोडप्याची स्कूटर बेवारस अवस्थेत आढळली, त्यानंतर मेघालय पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली.

यानंतर २ जून रोजी मेघालय पोलिसांना वेई सावडोंग धबधब्याजवळील एका खोल दरीत राजाचा मृतदेह कुजलेलया अवस्थेत आढळला. यामुळे त्याचा चेहरा ओळखता येत नव्हता, परंतु त्याच्या हातावर “राजा” नावाचा टॅटू असल्याने त्याची ओळख पटली. शवविच्छेदन अहवालात असे दिसून आले की राजाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने दोनदा वार करण्यात आले होते, ज्यामुळे ही हत्या झाल्याचे निष्पन्न झाले.

महिलेचा पांढरा शर्ट आणि…

पुढे ४ जून रोजी, पोलिसांना त्या ठिकाणी आणखी काही पुरावे सापडले. त्यामध्ये महिलेचा पांढरा शर्ट, औषधाच्या गोळ्यांची पट्टी, खराब झालेले मोबाईल फोन स्क्रीन आणि एक स्मार्टवॉच यांचा समावेश होता. यानंतर पोलिसांनी अधिकृतपणे हत्येचा गुन्हा दाखल केला.

दरम्यान इंदूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश दंडोटिया यांनी सांगितले की, सोनम ज्याच्याशी प्रेमसंबंधात होती, त्या २० वर्षीय राज कुशवाहाने १८ मे रोजी राजा आणि सोनमचे लग्न झाल्यानंतर हत्येची योजना आखली होती. राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी कुशवाहाने विशाल चौहान, आनंद कुमार आणि आकाश राजपूत यांना सुपारी दिली होती.

सोनम आणि प्रियकराची चूक

हा सर्व प्रकार सोनमच्या नियोजनानुसार चालला होता. यादरम्यान सोनम आणि तिचा कथिथ प्रियकर राज कुशवाह यांनी एक गंभीर चूक केली. ही चूक म्हणजे त्यांनी राजाच्या हत्येत वापरलेला चाकू. मेघालय पोलिसांच्या मते, त्यांना सापडलेला पहिला सुगावा म्हणजे राजाच्या हत्येत वापरलेला चाकू.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “या प्रकारच्या चाकूचा वापर या मेघालयात केला जात नाही, ज्यामुळे आम्हाला या हत्येत राज्याबाहेरील कोणीतरी सहभागी असल्याचा संशय आला. त्यानंतर आम्ही जोडप्याच्या कॉल रेकॉर्डची तपासणी करण्याचा निर्णय घेतला.”

ओरोपी अटकेत

दरम्यान सोनमच्या अटकेनंतर पोलिसांनी मध्य प्रदेशातून तिचा कथित प्रियकर राज कुशवाह याच्यासह तीन जणांना अटक केली आहे.