Bus Collides With Trailer In Rajasthan: राजस्थानमधील जोधपूर येथे एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. फलोदी जिल्ह्यातील माटोडा परिसरात एका भरधाव वेगाने येणाऱ्या पर्यटक बसने उभ्या असलेल्या ट्रेलर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये बस पूर्णपणे चुराडा झाला आहे. पर्यटक बसमधील अठरा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलीस अपघाताची आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरमधील फलोदी येथील माटोडा परिसरात हा अपघात झाला. भाविक बिकानेरमधील कोलायत येथे दर्शन घेतल्यानंतर टेम्पो ट्रॅव्हलरने सुरसागरला परतत होते. माटोडा येथील भारत माला एक्सप्रेसवेवर उभ्या असलेल्या ट्रेलरला बसने धडक झाली. या भीषण अपघातात १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
याशिवाय, तीन ते चार जण जखमी झाले आहेत. फलोदी रस्ते अपघाताची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आयुक्त ओम प्रकाश, अधीक्षक विकास राजपुरोहित आणि अनेक अधिकारी रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपस्थित आहेत.
राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “फलोदीच्या माटोडा भागात झालेल्या रस्ते अपघातात जीवितहानी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. सर्व जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मृतांच्या आत्म्यांना शांती मिळावी आणि जखमी लवकर बरे व्हावे अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी २ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. “राजस्थानातील फलोदी जिल्ह्यातील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना मृत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत”, असे पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर म्हटले आहे.
