Breaking Bad rajasthan case Teachers Lab: चित्रपट आणि वेबसीरीजचा समाजमनावर किती खोलवर परिणाम होत असतो, याची अनेक उदाहरणे याआधी समोर आलेली आहेत. सिने कलाकृतीतून जशी प्रेरणा घेतली जाते, तसे गुन्हे करण्याची पद्धतही अमलात आणली जाते. अमेरिकन वेबसीरीज ‘ब्रेकिंग बॅड’ ही ओटीटी जगतात प्रचंड लोकप्रिय आहे. रसायनशास्त्राचा एक प्राध्यापक आयुष्यात अपयशी ठरल्यानंतर अमली पदार्थांची प्रयोगशाळा थाटतो आणि त्यातून कोट्यवधी रुपये कमावतो, अशी या सीरीजची कथा आहे. वेबसीरीजमधील ही कथा राजस्थानच्या श्री गंगाधर जिल्ह्यातील दोन शिक्षकांनी सत्यात उतरवली. मात्र त्यांचे बिंग अखेर फुटले.
राजस्थानच्या श्री गंगाधर जिल्ह्यातील मुकलावा येथे राहणारा मनोज भार्गव (वय २५) हे उत्तम शिक्षक म्हणून नावाजलेला होता. स्थानिक सरकारी शाळेत तो रसायनशास्त्राचा विषय शिकवत होता. मात्र अमली पदार्थाची निर्मिती केल्याबद्दल त्याला अटक झाली आणि सर्वांनाच धक्का बसला.
शाळेचे मुख्याध्यापक किरण छाब्रा यांनी द इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना म्हटले की, मला ही बाब सजल्यावर धक्का बसला. मनोज २०२२ साली शाळेत रुजू झाला होता. तो एक उत्तम शिक्षक होता. रोज सकाळी तो माझ्या पाया पडायचा. शाळेतील सर्व नियम पाळून तो विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात झोकून देत होता. त्याने कधीही कुणाशी गैरवर्तन केलेले मी पाहिले नाही.
मुकलावामध्येच एका खासगी कोचिंग सेंटरमध्ये भौतिकशास्त्र शिकविणाऱ्या इंद्रजीत बिश्नोई (वय ३५) यालाही याच प्रकरणात अटक झाली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ८ जुलै रोजी त्यांच्या प्रयोगशाळेवर छापा टाकून दोघांना अटक केली. याच परिसरात त्यांनी दोन बीएचकेचा फ्लॅट भाड्याने घेतला होता, जिथे त्यांनी प्रयोगशाळा थाटली होती.
पंजाब आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या श्री गंगाधर जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विक्रीचे जाळे खोलवर पसरले आहे. अमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे २०२४ पासून आतापर्यंत या जिल्ह्यात १५० जणांचे प्राण गेले आहेत. त्यामुळे तपास यंत्रणांना अमली पदार्थांच्या तस्करीचा छडा लावायचा होता. श्री गंगाधर जिल्ह्यात एमडी ड्रग्जशी निगडित ही पहिलीच कारवाई ठरली आहे.
राजस्थान नार्कोटिक ब्युरोचे संचालक घनश्याम सोनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले की, जिल्ह्यात ठिकठिकाणी एमडी विकले जात असल्याची गुप्तवार्ता आम्हाला मिळाली होती. पण एमडी इतक्या सहजासहजी उपलब्ध होत नाही, त्यामुळे आम्हाला याच्या खोलात जायचे होते. आम्ही तपास सुरू केल्यानंतर दोन शिक्षक जिल्ह्यातच याची निर्मिती करत असल्याचे समोर आले.
ब्रेकिंग बॅडपासून प्रेरित
ब्रायन क्रॅन्स्टन यांची मूख्य भूमिका असलेल्या ब्रेकिंग बॅड या सीरीजपासून प्रेरणा घेत दोन्ही शिक्षकांनी ही प्रयोगशाळा थाटली होती. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, भार्गव आणि बिश्नोई हे बाजूच्या जिल्ह्यातून आले होते. ते आधीपासूनच हेरॉईनची विक्री करत होते. मागच्या वर्षी त्यांनी ही वेबसीरीज पाहिली आणि स्थानिक बाजारात उपलब्ध असलेल्या रसायनांपासून अमली पदार्थ तयार करण्याचा निर्णय घेतला.
दोन महिन्यांपूर्वी शहरात त्यांनी १० हजार रुपये भाडे देऊन सदर फ्लॅट भाड्याने घेतला आणि तिथे काम सुरू केले. एनसीबीने या फ्लॅटमधून ७८० ग्रॅम तयार एमडी जप्त केले. ज्याची बाजारातील किंमत दीड ते दोन कोटी आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भार्गव आणि बिश्नोई यांनी आतापर्यंत १५ कोटी रुपयांचे अमली पदार्थ विकले असावेत.