राजस्थानच्या प्रतापगढ जिल्ह्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका आदिवासी विवाहितेचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध होते आणि ती त्याच्या घरी राहात होती म्हणून तिला तिथून पळवण्यात आलं. त्यानंतर तिला मारहाण करुन तिची नग्न धिंड काढण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. २१ वर्षीय महिलेच्या पतीने आणि सासरच्या माणसांनीच हा प्रकार केला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.

जे. पी. नड्डा यांनी काय म्हटलं आहे?

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या घटनेवरुन राजस्थानच्या गेहलोत सरकारवर टीका केली आहे. राजस्थानच्या प्रतापगढ जिल्ह्यातला हा व्हिडीओ शरमेने खाली मान घालायला लावणारा आहे. मुख्यमंत्र्यांना कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नाही कारण ते मंत्रिगटातल्या कुरबुरी सोडवण्यातच व्यग्र आहेत. राजस्थानात महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्याकडे पूर्णतः डोळेझाक करण्यात आली आहे. राजस्थानची जनताच आता काँग्रेस सरकारला धडा शिकवेल अशी टीका नड्डा यांनी केली आहे.

पोलिसांनी काय सांगितलं आहे?

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध आहेत असा संशय तिच्या पतीला आणि तिच्या सासरच्यांना होता. याच संशयावरुन तिची धिंड काढण्यात आली. ही महिला गर्भवती आहे असंही पोलिसांनी म्हटलं आहे. विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरुन तिच्या पतीने आणि तिच्या सासरच्यांनी तिची नग्न धिंड काढली. ही महिला लग्नानंतरही दुसऱ्या पुरुषाबरोबर राहात होती. त्याच गोष्टीचा राग मनात ठेवून तिला त्या घरातून पळवून गावात आणण्यात आलं. तिच्या पतीने आणि तिच्या सासरच्या मंडळींनी तिला मारहाण करुन तिला विवस्त्र केलं आणि त्यानंतर तिची धिंड काढली.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं ट्वीट

या घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्वीट केलं आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी असं म्हटलं आहे की प्रतापगढ जिल्ह्यात जी घटना घडली ती कौटुंबिक वादातून झाली. एका २१ वर्षीय विवाहितेची नग्न धिंड काढण्यात आली. या प्रकरणातला तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलीस महासंचालकांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारचे अपराध करणाऱ्यांना सभ्य समाजात स्थान नाही. या गुन्हेगारांची जागा गजांच्या आडच आहे. त्यांच्याविरोधात खटला चालवला जाईल आणि फास्ट ट्रॅक कोर्टात जलदगतीने निर्णय घेऊन शिक्षा सुनावली जाईल असं ट्वीट अशोक गेहलोत यांनी केलं आहे.