राजस्थानमध्ये वर्षाअखेर विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. यासाठी सर्व पक्षांनी तयारी केली आहे. अशातच काँग्रेसचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार राजेंद्रसिंह गुढा यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ‘लाल डायरी’मुळे राजेंद्रसिंह गुढा चर्चेत आले होते. आज ( ९ सप्टेंबर ) राजेंद्रसिंह गुढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थान दौऱ्यावर आहेत. राजेंद्रसिंह गुढा यांच्या पक्षप्रवेशासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत झुनझुनमध्ये गेले होते. यावेळी झालेल्या जाहीर कार्यक्रमात गुढा यांना पक्षात प्रवेश दिला गेला. यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा : “मी ऐकलंय की लाल डायरीत काँग्रेसचे काळे कारनामे….”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची बोचरी टीका

दरम्यान, एका विधानानंतर राजेंद्रसिंह गुढा यांना मंत्रीपदावरून हटवण्यात आलं होतं. २१ जुलैला काँग्रेसने मणिपूरमधील घटनेवरून भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला होता. पण, तेव्हा राजेंद्रसिंह गुढा यांना पक्षाला घरचा आहेर देत, राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनेवरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा, राजेंद्रसिंह गुढा यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर २४ जुलैला राजेंद्रसिंह गुढा ‘लाल डायरी’ घेऊन विधानसभेत पोहचले होते. राजेंद्रसिंह गुढा यांनी दावा केला होता की, ‘लाल डायरी’त मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात आरोपांची पूर्ण लिस्ट आहे. त्यावेळी राजेंद्रसिंह गुढा यांना विधानसभेतून बाहेर काढण्यात आलं होतं. तर, काँग्रेस मंत्री आणि आमदारांनी राजेंद्रसिंह गुढा यांच्यापासून ‘लाल डायरी’ हिसकावून घेतली होती. पण, लाल डायरीची दुसरी प्रत आपल्याकडं असल्याचा दावा गुढा यांनी केला होता.