नवी दिल्ली: प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांना शुक्रवारी राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण देऊन गौरवण्यात आले. सुतार यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे हा पुरस्कार नोएडा येथील त्यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदान केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार उपस्थित होते.
सुतार यांनी पुरस्कार स्वीकारल्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची वाढली, अशी भावना मुख्यमंत्री तसेच, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. तर, राम सुतार यांच्या वतीने त्यांचे पुत्र अनिल सुतार यांनी राज्य सरकार तसेच, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
‘महाराष्ट्र भूषण-२०२४’च्या निवड समितीने राम सुतार यांचा सन्मान करण्याचा एकमताने निर्णय घेतला. “सुतार यांचा मुंबईत भव्य सोहळ्यात पुरस्कार देऊन सन्मान करण्याचे ठरले होते. त्यासंदर्भात राम सुतार यांच्याशी बोलणेही झाले होते. पण, त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना नोएडामध्ये त्यांच्या घरीच पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय आम्ही घेतला. हा पुरस्कार २०२४चा असून आता २०२५ वर्षही संपत आले आहे, त्यामुळे इथे येऊन आम्ही त्यांचा गौरव केला,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राम सुतार शंभर वर्षांचे असून त्यांनी गेल्या ७७ वर्षांमध्ये हजारो शिल्पे घडवली आहेत. त्यांना पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेलांचा जगातील सर्वात उंच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळा सुतार यांनीच उभा केला आहे. त्यांनी निर्माण केलेली शिल्पे १५ देशांमध्ये उभी आहेत. मुंबईतील इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा बनवण्याचेही काम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर सुतार यांच्या तोंडी ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा!’ हेच बोल होते. महाराष्ट्राच्या राज्यगीताच्या ओळी ऐकताना आमचेही उर अभिमानाने भरून पावले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांच्या मनात फक्त महाराष्ट्राचाच विचार होता.– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
राम सुतार हे मराठी माणसाचा मानबिंदू आहेत, भूषण आहेत. संसदेतील १६ शिल्पे राम सुतारांनी उभी केली आहेत, सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळा हा देखील त्यांचीच कलाकृती आहे.-एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
राम सुतार यांच्या शिल्पाकृती अनेक पिढ्यांनी पाहिल्या आहेत. त्यांची शिल्पे पाहून आम्ही नतमस्तक होतो. इथे आम्हाला त्यांचा स्टुडिओ पाहता आला. आम्ही भाग्यवान आहोत. अवघ्या महाराष्ट्राला त्यांचा अभिमान वाटतो.-अजित पवार, उपमुख्यमंत्री
