Reddit Viral Post : सध्याच्या काळात नोकरीसाठी अनेकजण धडपड करत असतात. काहीजण नोकरीसाठी विदेशात देखील जातात. पण विदेशात नोकरीसाठी प्रयत्न करत असताना अनेकांना कधी-कधी वेगवेगळे अनुभव येत असतात. आता विदेशात नोकरीसाठी प्रयत्न करताना आलेला एक अनुभव रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका युजर्सने शेअर केला आहे.

या युजर्सने दुबईमध्ये नोकरीच्या मुलाखतीदरम्यान त्याच्या बहिणीला कशा प्रकारे अपमानित करण्यात आलं? याबाबत सांगितलं आहे. या रेडिट युजर्सचा दावा आहे की, त्याची बहीण दुबईमध्ये पर्सनल असिस्टंट पदासाठी एका ठिकाणी मुलाखतीसाठी गेली होती. मात्र, मुलाखतीवेळी तिला अपमानास्पद परिस्थितीचा सामना करावा लागला.

या रेडिट युजर्सने म्हटलं आहे की, “माझ्या बहिणीला दुबईतील नोकरीच्या मुलाखतीवेळी अपमानित करण्यात आलं. दुबईतील एका व्यक्तीने पर्सनल असिस्टंट पदासाठी माझ्या बहिणीला मुलाखतीला बोलावलं. तो एक व्यवसायिक असल्याचा दावा त्याने केला. माझी बहीण जेव्हा मुलाखतीसाठी गेली तेव्हा तिने तिच्या लिंक्डइन प्रोफाईलमध्ये म्हटलं होतं की तिच्याकडे पदवी नाही. मात्र, तरीही त्याने तिला मुलाखतीसाठी बोलावलं. पण मुलाखत ऑफिसमध्ये नाही तर कॅफेमध्ये झाली”, असा आरोप एका रेडिट युजर्सने केला आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

या रेडिट युजर्सने पुढे म्हटलं की, “माझी बहीण मुलाखतीला गेल्यानंतर त्या व्यक्तीने सुरुवातीचे १० मिनिटे तिच्याकडे दुर्लक्ष केलं. तो फोनवर बोलत राहिला. शेवटी तो म्हणाला की, मी माझ्या एचआरला विचारलं. पण पदवीशिवाय नोकरीचं शक्य नाही. त्यानंतर त्या व्यक्तीने तिला अपमानित करण्याचा प्रयत्न केला, असं या रेडिट युजर्सने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मुलाखतीला बोलावलेल्या त्या व्यक्तीने म्हटलं की, “पदवीशिवाय तुला इथे नोकरी मिळणार नाही. तू कदाचित भाग्यवान असतील तर तुला रिसेप्शनिस्टची नोकरी मिळेल. पण तू जेव्हीसीमध्ये का राहते? शारजाहला निघून जा. तू दुबईमध्ये फिरायला जाती का? तू तुझ्या देशात परत जा. तुझ्या पात्रतेसाठी मी तुला एक व्हिसा देऊ शकतो, अशा कमेंट्स त्या व्यक्तीने केल्या. त्यानंतर माझी बहीण त्या मुलाखतीतून निराश होऊन निघून गेली”, असं या रेडिट युजर्सने म्हटलं आहे. त्याने पुढे असंही म्हटलं की, खरं तर ही मुलाखत नव्हती, ती शाब्दिक शिवीगाळ आणिविदेशी लोकांबद्दल द्वेषपूर्ण वागणूक होती”, असा आरोपही त्याने केला.