पाटणा : ‘मतचोरी’साठी निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत केल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव यांनी बुधवारी केला. भाजप नेते दोन मतदार ओळखपत्रे मिळवून देण्यात मदत करीत असल्याचेदेखील ते म्हणाले. तसेच मतदारयादीतील कथित अनियमितता दूर न केल्यास ‘राजद’ विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकू शकते, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांच्याकडे दोन मतदार ओळखपत्रे असल्याचा दावा यादव यांनी केला. दरम्यान, सिन्हा यांनी यादव यांचे आरोप फेटाळून लावले व कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला. तसेच यादव यांनी स्वत:चीच कागदपत्रे जाहीर करावी ज्यात दोन वेगवेगळ्या जन्मतारखा असल्याचा पलटवारही केला. दरम्यान, भाजपने यादव यांचे आरोप खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याची टीका केली. यादव यांनी निवडणूक आयोगावर भाजपसाठी अनेक बनावट मतदार तयार करण्यास मदत केल्याचाही आरोप केला.

विशेष सखोल फेरनिरीक्षणच्या प्रारंभीच्या प्रक्रियेनंतर आयोगाने ने प्रकाशित केलेल्या मसुदा मतदार यादीला मतांची ‘लूट’च म्हटले पाहिजे. आयोग राज्यातील भाजप नेत्यांना दोन मतदार ओळखपत्रे मिळविण्यात मदत करत आहे. जेव्हा निवडणूक आयोग स्वतः एकाच मतदारसंघात हे करत आहे, तेव्हा ‘एसआयआर’चा अर्थ काय? याचा अर्थ निवडणूक आयोग एकाच घरातील भाजप समर्थकांसाठी अनेक बनावट मतदार तयार करण्यास मदत करत आहे – तेजस्वी यादव, नेते, राजद

मुझफ्फरपूरच्या महापौरांकडे दोन मतदार ओळखपत्रे

मुझफ्फरपूरच्या महापौर निर्मला देवी यांच्याकडे दोन मतदार ओळखपत्रे असल्याचा आरोपदेखील यादव यांनी केला. निर्मला देवी भाजपच्या प्रमुख नेत्या असून आगामी विधानसभा निवडणुकीत त्या भाजपच्या संभाव्य उमेदवारही असल्याचे यादव म्हणाले. मसुदा मतदार यादीनुसार त्यांच्याकडे एका विधानसभा मतदारसंघातील दोन वेगवेगळ्या बूथचे दोन मतदार ओळखपत्र आहेत, असे सांगतानाच त्यांनी मतदार ओळखपत्र आरईएम१२५१९१७ आणि जीएसबी १८३५१६४ चा दाखला देत यात वेगवेगळ्या वयोगटांचा उल्लेख असल्याचा दावादेखील केला. तसेच एसआयआरच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी दोन वेगवेगळे अर्ज केले असावेत, अशी शंकाही व्यक्त केली.

गुजरातचे रहिवासी बिहारचे मतदार

आता गुजरातचे रहिवासी बिहारमध्ये मतदार झाल्याचा दावादेखील यादव यांनी केला. गुजरातचे रहिवासी आणि बिहार भाजपचे प्रभारी भिखुभाई दलसानिया हे पाटण्याचे मतदार झाले असून त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये मतदान केले होते. गेल्या काही वर्षांपासून ते (भाजप नेते) जागा बदलून मतदान करत असल्याचा दावा यादव यांनी केला. यासह दलसानिया यांचा पत्ता किंवा घराचा क्रमांकदेखील मतदार यादीत नसल्याकडे यादव यांनी लक्ष वेधले. बिहारच्या मतदार यादीत त्यांचे नाव हिंदीत नाही तर गुजराती भाषेत असल्याचादेखील दावा यादव यांनी केला.