Assam University student missing: आसाम विद्यापीठातील लायब्ररी सायन्स शाखेचा विद्यार्थी रोहित चंदा हा रहस्यमय परिस्थितीत बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. तो विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा तात्पुरता सचिव तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा राज्य संयुक्त सचिव म्हणून काम करत होता. सिलचरच्या गुरुचरण कॉलेजमध्ये कथित विद्यार्थी प्रवेश अनियमिततेमुळे रोहित बेपत्ता झाल्याची चर्चा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित १७ जुलै रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्याच्या दूध पाटील निवासस्थानातून निघाला. घरातून बाहेर पडताना त्याने त्याचा मोबाईल फोन, स्कूटर किंवा कोणतेही वैयक्तिक सामान सोबत घेतले नाही. मात्र घरातून गेल्यापासून त्याचा कोणताही संपर्क किंवा ठावठिकाणा सापडलेला नाही.
त्याच्या अचानक बेपत्ता होण्यामुळे सहकारी विद्यार्थी आणि विद्यापीठातील कर्मचाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. कुटुंबीय आणि मित्रांना फोटो सोशल मीडियावर प्रसारित केला आहे आणि लोकांना त्याचा शोध घेण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती सांगितलेली नाही.
एका स्थानिक वेबसाईट द रिव्हिलने दिलेल्या वृत्तानुसार, गुरूचरण कॉलेजमधील प्रवेश घोटाळ्याशी रोहित आणि त्याच्या सहकाऱ्यांचा संबंध होता. प्रवेश घोटाळ्याचे प्रकरण समोर आल्यानंतर काही दिवसांनीच रोहितच्या बेपत्ता होण्यामुळे संशय निर्माण होत आहे. रोहितच्या एका सहकाऱ्यासोबतच्या एका व्हायरल व्हॉइस रेकॉर्डिंगमुळे या प्रकरणात वेगळे वळण आले आहे. या रेकॉर्डिंगमध्ये तो एका उमेदवाराला रोहितचा उमेदवार असल्याचे म्हणत आहे. या ऑडिओची सत्यता अद्याप पडताळण्यात आलेली नाही.
याबाबत अधिक माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.