भांडवली बाजार नियामक अर्थात ‘सेबी’ने उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडसह(आरआयएल) अन्य दोन कंपन्यांना एकूण 70 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेबीने नोव्हेंबर 2007 मध्ये रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडमध्ये (आरपीएल) आढळलेल्या शेअर घोटाळा प्रकरणी ही कारवाई केली.
सेबीने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला 25 कोटी, कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांना 15 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. याशिवाय नवी मुंबई एसईझेड प्रायव्हेट लिमिटेडला 20 कोटी आणि मुंबई एसईझेड लिमिटेडला 10 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. नोव्हेंबर 2007 मधील शेअर्सच्या खरेदी-विक्री प्रकरणात मुकेश अंबानी व रिलायन्स इंडस्ट्रीजला दंड ठोठावला आहे.
मार्च 2007 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने आरपीएलचे 4.1 टक्के शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर आरपीएलचे आरआयएलमध्ये विलीनीकरण करण्यात आले होते. याप्रकरणी सेबीचे अधिकारी बी. जे. दिलीप यांनी 95 पानांच्या आदेशपत्रात कोणाला किती दंड आणि त्याची कारणे या संदर्भात सविस्तर माहिती नमूद केली आहे. गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी तसेच भविष्यात अशी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्वांनाच योग्य तो इशारा देण्याकरिता सेबीने दोषींना दंड भरण्याचा आदेश दिला. रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेड कंपनीच्या नोव्हेंबर 2007 मध्ये झालेल्या शेअरच्या व्यवहारांमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी सेबीने ही दंडात्मक कारवाई केली आहे.