उद्या चॅम्पियन्स ट्रॉफी अंतर्गत होणाऱ्या फायनल मॅचमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने-सामने आहेत. या सामन्यावर एक दोन नाही तब्बल २ हजार कोटींचा सट्टा लागल्याची बातमी समोर येते आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना कायमच जगाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये हा सामना म्हणजे गौरवाचा विषय आहे. उद्या नेमके काय होणार? याची सोशल मीडियावर आणि विविध कार्यालयांमध्ये तसेच ट्रेनमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. उद्या ‘फादर्स डे’ आहे. या दिवशी भारत सामना जिंकून पाकिस्तानला आपणच ‘बाप’ असल्याचे दाखवून देईल अशीही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अशात उद्या होणाऱ्या या सामन्यावर २ हजार कोटींचा सट्टा लागल्याची बातमी समोर येते आहे.

बुकीजची आवडती टीम अर्थातच टीम इंडिया आहे. कोणी या सामन्यावर १०० रूपये लावले आणि भारत ही मॅच जिंकला तर १०० रूपये लावणाऱ्याला १४७ रूपये मिळतील. तर पाकिस्तानच्या टीमवर १०० रूपये लावले आणि पाकिस्तान हा सामना जिंकला तर १०० रूपये लावणाऱ्याला ३०० रूपये मिळतील. खरेतर सट्टा हा भारतात बेकायदेशीर आहे. मात्र इंग्लंडमध्ये सट्टा कायदेशीर आहे. त्यात भारत आणि पाकिस्तानचा सामना आहे त्यामुळे सट्टाबाजार चांगलाच तेजीत आला आहे. AIGF अर्थात ऑल इंडिया गेमिंग फाऊंडेशनच्या माहितीनुसार, भारत पाकिस्तान सामना हा एक हायप्रोफाईल सामना आहे त्यामुळे त्या सामन्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर सट्टा लागला आहे.

या सामन्यात नेमके काय होणार? म्हणजेच कोण जिंकणार-कोण हारणार या निर्णयावर २ हजार कोटींचा सट्टा लागला आहे. तसेच या सामन्याच्या विविध भागांवरही सट्टा लागला आहे. सामन्याच्या सुरूवातीच्या ओव्हर्समध्ये कोणती टीम किती धावा करेल? कोणता गोलंदाज जास्त गडी बाद करेल? मॅन ऑफ द मॅच कोण असेल? अशा गोष्टींवरही सट्टा लागला आहे. भारतातून यू.के.च्या वेबसाईटवर इंटरनॅशनल क्रेडिटकार्डमार्फतही हा सट्टा खेळला जाऊ शकतो. त्यामुळे उद्या होणाऱ्या भारत पाक सामन्याची उत्सुकता जेवढी चाहत्यांना आहे तेवढीच सट्टा बाजारातल्या बुकींना आणि सट्टा खेळणाऱ्यांनाही लागून राहिली आहे.

भारत आणि पाकिस्तानचा हा सामना सुरू होण्याआधीच पाकिस्तानकडून विविध प्रकारचे माईंड गेम सुरू झाले आहेत. टीम इंडियाचा टीकाव लागणार नाही, विराट कोहली थोडा चिंतेत आहे. विराट कोहली दबावाखाली खेळेल अशा प्रकारची वक्तव्ये पाकिस्तानकडून केली जात आहेत. मात्र या सगळ्याचा भारतीय टीमच्या उत्साहावर काहीही परिणाम होणार नाहीये हे निश्चित. आता उद्या मैदानातला प्रत्येक क्षण अनुभवण्यासाठी तिथे असलेले प्रेक्षक आणि टीव्ही समोर बसलेले कोट्यवधी भारतीय उत्सुक आहेत हे निश्चित.