RSS Chief Mohan Bhagwat Speech: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत हे राजस्थानच्या बारन नगरमधील कृषी उत्पन्न बाजारपेठेत एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंदू समाजाची व्याख्या करताना ‘भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे’, असा उल्लेख केला. तसेच, मोहन भागवत यांनी यावेळी हिंदू समाजाला एक महत्त्वपूर्ण आवाहन केलं. एएनआयनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवारी झालेल्या या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी हिंदू कुणाला म्हणायचं यावर भाष्य केलं आहे. “भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे. हिंदू हे नाव जरी कालांतराने आलं असलं, तरी आपण इथे प्राचीन काळापासून राहात आलो आहोत. ‘हिंदू’ हे नाव इथे राहणाऱ्या सर्वच भारतीय समाजांसाठी वापरलं गेलं होतं. हिंदूंनी सगळ्यांना आपलं मानलं आणि सगळ्यांचा स्वीकार केला. हिंदू तेव्हा सगळ्यांना म्हणाले की आम्ही बरोबर आहोत आणि तुम्हीही तुमच्या जागी बरोबरच आहात”, असं मोहन भागवत यावेळी म्हणाले.

“जगात आरएसएसच्या कामाला तोड नाही”

दरम्यान, यावेळी मोहन भागवतांनी जगात आरएसएस ज्या प्रकारे काम करतेय त्याला तोड नाही, असं नमूद केलं. “संघाचं काम हे यंत्रवत नसून विचारांवर आधारित आहे. त्यामुळे जगात अशा कोणत्याच कामाची तुलना संघाच्या कामाशी होऊ शकत नाही. संघाची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. संघाकडून मूल्य आधी गटप्रमुखांपर्यंत जातात. त्यानंतर ती गटप्रमुखांकडून स्वयंसेवकांकडे जातात. स्वयंसेवकांकडून ती मूल्यं त्यांच्या कुटुंबांपर्यंत जातात. ही संघाची व्यक्तिमत्व विकासाची पद्धत आहे”, असं सरसंघचालकांनी यावेळी नमूद केलं.

अग्रलेख : सरसंघचालकांचे तरी ऐका…

हिंदू समुदायाला मोहन भागवतांचं आवाहन

सरसंघचालकांनी यावेळी बोलताना भारतातील हिंदू समुदायाला महत्त्वाचं आवाहन केलं. “स्वत:च्या सुरक्षेसाठी हिंदू समाजाला स्वत:मधले भाषा, जात व प्रांताच्या आधारावरचे मतभेद व वाद बाजूला ठेवून एकत्र यायला हवं. संस्थात्मक रचनेचा अंगीकार, सर्वांचं हित जपण्याची इच्छा आणि सौहर्दपूर्ण वातावरण असा समाज असायला हवा. वागण्यात शिस्त, देशाच्या प्रती कर्तव्य आणि ध्येयाप्रती उच्च मूल्यांच्या आधारे प्रयत्न या बाबी समाजासाठी आवश्यक असतात. हा समाज एक व्यक्ती किंवा एका कुटुंबानं तयार होत नाही. उलट आपण संपूर्ण समाजासाठी विचार करून आपल्या आयुष्यातील ईश्वराचा शोध घेऊ शकतो”, अशा शब्दांत मोहन भागवत यांनी हिंदू समाजाला उद्देशून भाष्य केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss chief mohan bhagwat appeals to hindu community in india pmw