लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे काही प्रसंगातून समोर आले. संघाचे सरसंघचालक यांनी निकालानंतर संघसेवकांनी नम्रतेने राहावे आणि समाजात दुफळी निर्माण होईल अशी विधाने पुढाऱ्यांनी करू नये, असा सल्ला दिला. ऑर्गनायझर या संघाच्या मुखपत्रातून रतन शारदा यांनीही टिकात्मक लेख लिहून भाजपाला खडे बोल सुनावले. तर संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी राजस्थान येथे एका कार्यक्रमात बोलत असताना म्हणाले की, ज्यांच्यात अहंकार भरला होता, त्यांना प्रभू श्रीरामाने बहुमतापासून रोखले. या विधानाचा वापर करून विरोधकांनी भाजपावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता इंद्रेश कुमार यांनी आपल्या विधानापासून घुमजाव केले आहे.

“जे अहंकारी होते, त्यांना प्रभू रामाने २४० वर अडवलं”, संघाची भाजपावर खोचक टीका

इंद्रेश कुमार यांच्या वक्तव्यानंतर गदारोळ होताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही त्यापासून अंतर राखले. इंद्रेश कुमार यांचे विधान वैयक्तिक असल्याची टिप्पणी संघाकडून देण्यात आली. यानंतर कुमार यांनी सारवासरव केली. “ज्यांनी प्रभू श्रीरामाचा संकल्प केला, ते आज सत्तेत आहेत”, असे नवे विधान त्यांनी केले आहे. त्याआधी गुरुवारी जयपूर येथे एका कार्यक्रमात बोलत असताना ते म्हणाले की, ज्यांनी प्रभू रामाची भक्ती केली, ते हळूहळू अहंकारी बनत गेले. त्यांनी स्वतःला सर्वात मोठा पक्ष असल्याचे जाहीर केले. त्यांच्या अहंकारामुळे प्रभू रामाने त्यांना २४० वरच रोखलं.

“RSS नरेंद्र मोदींना सत्तेतून…”, संघातील नेत्यांच्या ‘त्या’ वक्तव्यांचा दाखला देत राऊतांचं मोठं वक्तव्य

शुक्रवारी इंद्रेश कुमार यांनी आणखी एक विधान केले. यावेळी त्यांनी भाजपाची स्तुती करताना म्हटले, “ज्यांनी प्रभू रामाचा विरोध केला, ते आज सत्तेबाहेर आहेत. ज्यांनी रामाचा संकल्प केला, ते आज सत्तेत आहेत.”

इंद्रेश कुमार यांच्या पहिल्या विधानानंतर काँग्रेसने भाजपावर टीका करण्याची संधी साधली. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, संघाने मागच्या दहा वर्षात सत्ता उपभोगली, मात्र आता निकाल विरोधात गेल्यानंतर त्यांना भाजपाचा अहंकार दिसला आहे. काँग्रेसप्रमाणेच शिवसेना उबाठा गटाच्या संजय राऊत यांनीही भाजपावर टीका केली. ते म्हणाले, मागच्या दहा वर्षात भाजपाने सत्तेचा दुरुपयोग केला. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून सूडाचे राजकारण केले. तेव्हा संघाला खरंतर ही भूमिका मांडायला हवी होती. पण तरीही संघाला आता भाजपाच्या चुका लक्षात आल्या असतील तर त्यांनी नरेंद्र मोदींना सत्तेतून दूर करावे.