RSS Denies Sexual Abuse Allegations: केरळमधील तिरुअनंतपुरममधील २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने ९ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने १५ पानी सुसाइड नोट लिहिल्याचे सांगितले जात आहे. या कथित सुसाइड नोटमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी लैंगिक शोषण केल्याचा दावा सदर तरूणाने आत्महत्येपूर्वी केल्याचे सांगितले जाते. काँग्रेस नेत्या आणि केरळमधील वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी या प्रकरणावर एक्सवर पोस्ट करून चौकशीची मागणी केली. जर आरोप खरे असतील तर हे भयानक प्रकरण आहे, असे त्या म्हणाल्या होत्या. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

कोट्टयम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या २६ वर्षीय आनंदू अजी याने आत्महत्या केल्याची घटना दुःखद आणि दुर्दैवी असल्याचे संघाने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. “दक्षिण केरळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ”, असे लेटरहेड असलेल्या पत्रावर एक प्रसिद्धी पत्रक छापले गेले आहे. एएनआय वृत्तसंस्थेने या पत्राची प्रत शेअर केली आहे.

संघाने या पत्रात म्हटले की, आनंदु अजीचा अनैसर्गिक मृत्यू अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. त्याच्या मृत्यूच्या परिस्थितीची व्यापक चौकशी व्हावी, अशी कोट्टयम जिल्हा संघाची मागणी आहे. तसेच त्याच्या मृत्यूनंतर लगेचच इन्स्टाग्राम, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चिठ्ठीचीही पडताळणी व्हावी. या चिठ्ठीत संघावर संशयास्पद आणि निराधार आरोप करण्यात आले आहेत. स्वतंत्र चौकशीतून त्याच्या अनैसर्गिक मृत्यूचे खरे कारण बाहेर येईल, असा आमचा विश्वास आहे.”

दक्षिण केरळचे संघ प्रांत कार्यवाह केबी श्रीकुमार यांची या पत्रावर स्वाक्षरी आहे. त्यांनी पत्रात पुढे म्हटले, कोट्टयम जिल्ह्यातील एलिक्कुलम येथील आनंदु अजी यांचे कुटुंबिय अनेक वर्षांपासून संघाशी जोडलेले आहेत. आनंदुचे वडील स्व. अजी हे संघाचे कार्यकर्ते होते. या दुःखद आणि दुर्दैवी प्रसंगी आम्ही त्याच्या कुटुंबियांच्या पाठी खंबीरपणे उभे आहोत.

या पत्रानंतर संघाने जिल्हा पोलिसांकडे या प्रकरणाची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपास पथकाकडून कुटुंबिय आणि आनंदु अजीच्या मित्रांचे जबाब नोंदविले जात आहेत.

दरम्यान काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी यासंबंधी माध्यमात आलेल्या काही बातम्या त्यांच्या एक्स हँडलवर शेअर केल्या आहेत. त्या म्हणाल्या की, आनंदु अजीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत जे आरोप केलेत, त्याची संघाने चौकशी होऊ दिली पाहिजे. संपूर्ण भारतात लाखो लहान मुले, तरूण संघाच्या शाखेत जात असतात. यामुळे हे प्रकरण गंभीर आहे. याच्या मुळाशी जाऊन चौकशी झाली पाहीजे.

कथित सुसाइड नोटमध्ये आरोप काय?

आनंदु अजीच्या मृत्यूनंतर जी नोट व्हायरल होत आहे, त्यात लिहिलेले आहे, “मी ३-४ वर्षांचा असताना माझ्या वडिलांनी मला संघाच्या शाखेत नेले. तिथे अनेक लोकांनी माझे लैंगिक शोषण केले. त्यामुळे माझ्या मनावर आयुष्यभरासाठी आघात झाला. नैराश्य आणि गंभीर आजाराशी अनेक वर्ष झुंज दिल्यानंतर मी आता स्वतःचे आयुष्य संपविण्याच्या निर्णयाप्रत आलो आहे.”