वृत्तसंस्था, कीव्ह
युक्रेनने रशियाची ४१ विमाने हल्ला करून नष्ट केल्याच्या मोहिमेला ‘हुशारीने केलेली मोहीम’ असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. या मोहिमेतून रशियातील केवळ लष्करी लक्ष्य भेदण्यात आल्याचेही ते म्हणाले. दीड वर्षापासून या हल्ल्याचे नियोजन सुरू होते, अशी माहिती झेलेन्स्की यांनी दिली.

रशियावरील असा हल्ला निश्चितच योग्य असून, ते त्यास पात्रच आहेत, असे झेलेन्स्की म्हणाले. झेलेन्स्की यांनी रविवारी देशाला उद्देशून भाषण केले. त्यात त्यांनी रशियावरील हल्ल्याबाबत लष्कराचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘‘या मोहिमेत ११७ ड्रोनचा वापर करण्यात आला. हवाई तळांवर ठेवण्यात आलेली ३४ टक्के क्रूज क्षेपणास्त्रे उडविण्यात आली. रशियाच्या विविध भागांत ही मोहीम राबविली गेली,’’असे ते म्हणाले.

दीड वर्षांपूर्वी मी ज्या मोहिमेला मान्यता दिली होती, ती अखेर यशस्वी झाली. लष्करी मोहिमेपूर्वी रशिया युक्रेनवर मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याचे गुप्तचरांकडून आलेली माहिती होती. लोकांनी हवाई हल्ल्याच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नये.

वोलोदिमिर झेलेन्स्की, अध्यक्ष, युक्रेन

इस्तंबुलमध्ये शांतता चर्चा

इस्तंबुल : रशिया आणि युक्रेनचे शिष्टमंडळ शांततेच्या चर्चेसाठी तुर्कीमध्ये सोमवारी भेटले. दोन आठवड्यांतील चर्चेची ही दुसरी फेरी आहे. रशियाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे सल्लागार व्लादिमिर मेदिन्स्की यांनी केले तर युक्रेनच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षणमंत्री रुस्तम उमेरोव्ह यांच्याकडे होते. युक्रेनने रविवारी रशियाची विमाने मोठ्या प्रमाणावर नष्ट केल्यामुळे या चर्चेतून काही ठोस निष्पत्ती होण्याची शक्यता कमी आहे. चर्चेची पहिली फेरी १६ मे रोजी पार पडली होती. यावेळी तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हकान फिदान तुर्की, लष्करप्रमुख मेटिन गुरक आणि गुप्तचर संस्थेचे प्रमुख इब्राहिम कालिन हेही उपस्थित होते.

‘पुतिन नव्या हल्ल्याच्या तयारीत’

पॅरिस : एकीकडे शांततेबाबत चर्चा करीत असताना रशियाचे अध्यक्ष पुतिन युक्रेनमध्ये नवी लष्करी आघाडी उघडण्याची तयारी करीत आहेत, असा इशारा अमेरिकेच्या दोन सिनेटरनी दिला. पुढील दोन आठवडे युद्धाची पुढील दिशा ठरवतील, असे ते म्हणाले. रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर रिचार्ड ब्लुमेंथल यांनी हा इशारा दिला.