Why Russia Bans Fuel Exports? is Moscow Running Out of Oil : गेल्या अडीच वर्षांपासून रशिया व युक्रेनमध्ये युद्ध चालू आहे. या युद्धादरम्यान युक्रेन सातत्याने रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर क्षेपणास्त्र हल्ले करत आहे. या हल्ल्यांनंतर मॉस्कोने मोठा निर्णय घेतला आहे. रशियाने गुरुवारी (२५ सप्टेंबर) डिझेलच्या निर्यातीवर अंशतः बंदी घातली आहे. तसेच पेट्रोलच्या निर्यातीवरील बंदी या वर्षाच्या अखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे. भारत सध्या रशियाकडून तेल आयात करत आहे. अमेरिकेचा विरोध जुगारून भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे. अशातच रशियाने तेलाची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे याचा भारतावर काय परिणाम होईल असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

युक्रेनच्या रशियातील तेल शुद्धीकरण प्रकल्पांवरील हल्ल्यांमुळे रशियाचं बरंच नुकसान झालं आहे. त्यामुळे रशियाच्या तेल शुद्धीकरणाच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार रशियाच्या अनेक बंदरांवरून होणारी तेलाची निर्यात प्रभावित झाली आहे. तसेच तेलाचं उत्पादन तब्बल २० टक्क्यांनी घटलं आहे. रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक म्हणाले की “तेलाच्या उत्पादनात काही प्रमाणात घट झाली आहे. परंतु, आपल्याकडील तेलाचा साठा ही घट भरून काढेल.”

भारतावर काय परिणाम होणार?

रशियन वृत्तसंस्था इंटरफॅक्सच्या अहवालानुसार अलेक्झांडर नोव्हाक म्हणाले की “देशांतर्गत बाजारातील पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. डिझेलच्या निर्यातीवरील अंशतः बंदी ही केवळ त्या रिसेलर्ससाठी लागू असेल जे स्वतः डिझेलं उत्पादन व शुद्धीकरण करत नाहीत. तर, पेट्रोलवरील बंदी ही सर्व उत्पादक व विक्रेत्यांवर लागू असेल. मात्र, रशिया आणि इतर देशांमधील सरकारी करारांवर या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही. या करारानुसार होणारी निर्यात चालू राहील.” याचाच अर्थ रशियन सरकारच्या या निर्णयाचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही. कार भारत व रशियात तेल खरेदीसंदर्भात करार झाला आहे.

क्रीमियाचे राज्यपाल सर्गेई अक्स्योनोव्ह यांनी इंधनाचा पुरवठा कमी झाल्याचं मान्य केलं आहे. मात्र, यासाठी त्यांनी युक्रेन व तेलशुद्धीकरण कारखान्यांना जबाबदार धरलं आहे. अनेक कारखाने बंद असल्यामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याचं त्यांनी सांगितलं. रशियाने २०२४ मध्ये तब्बल ८.६ कोटी मेट्रिक टन डिझेल उत्पादन केलं होतं. त्यापैकी ३.१ कोटी मेट्रिक टन डिझेलची निर्यात केली.

रशियातील दुसरी सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी लुकोइलने मॉस्कोमधील पेट्रोल पंपांवरून जेरी कॅनमधून होणारी पेट्रोलची विक्री बंद केली आहे. रशिया आणि अमेरिका हे समुद्रमार्गे डिझेलची निर्यात करणारे दोन सर्वात मोठे देश आहेत. मात्र युक्रेनबरोबरच्या युद्धामुळे रशियाची डिझेल निर्यात प्रभावित झाली आहे.