Vladimir Putin On Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून संघर्ष सुरु आहे. रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ले करत असून यामध्ये युक्रेनची अनेक शहरे उद्ध्वस्त होत आहेत. युक्रेन-रशियातील हा संघर्ष थांबण्यासाठी आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी सफल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युक्रेनने तत्काळ युद्धबंदी लागू करण्यास तयारी दर्शवल्यानंतर सध्या चर्चांच्या फेऱ्या सुरु आहेत. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदी प्रस्तावावर व्लादिमीर पुतिन हे सहमत असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युद्धबंदी प्रस्तावानंतर युक्रेनसाठी काही अटी शर्थींची मागणी व्लादिमीर पुतिन यांनी केली आहे. यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी एक महत्वाची प्रतिक्रिया देत आपण व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनियन सैनिकांना जीवंत सोडण्याची विनंती केल्याचं म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आवाहनानंतर आता व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनियन सैनिकांबाबत एक महत्वाचं विधान केलं आहे.

‘जर युक्रेनियन सैन्याने आत्मसमर्पण केलं तर त्यांचे प्राण वाचतील’, असं व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांना रशियाने पूर्णपणे वेढलेल्या युक्रेनियन सैन्याचे प्राण वाचवण्याची विनंती केल्यानंतर व्लादिमीर पुतिन यांनी त्यासाठी तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यासाठी युक्रेनियन सैन्याने आत्मसमर्पण करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता याबाबत युक्रेनियन सैन्य काय करणार? याकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे. या संदर्भातील वृत्त रॉयटर्सच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांना काय विनंती केली?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या प्लॅटफॉर्मवर लिहीलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, “रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन आणि आमच्यात काल खूप चांगली आणि उपयुक्त चर्चा झाली आणि हे भयानक, रक्तरंजित युद्ध अखेर संपुष्टात येण्याची शक्यता आहे. पण या क्षणाला हजारो युक्रेनियन सैनिक हे पूर्णपणे रशियन लष्कराने वेढलेले आहेत आणि ते खूप वाईट स्थितीत आहेत. मी व्लादीमीर पुतिन यांच्याकडे त्या सैनिकांना जीवंत सोडण्यासाठी विनंती केली आहे. हा एक भीषण नरसंहार असेल, जो दुसर्‍या महायुद्धानंतर कधीही पाहिला गेला नाही. देव त्या सर्वांचे रक्षण करो”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia ukraine war vladimir putins big statement ukrainian troops will be spared if they surrender gkt