Russia Ukraine War : गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरु आहे. रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ले करत असून या संघर्षात युक्रेनमधील अनेक शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर या युद्धाचे परिणाम जगभरातील अनेक देशांवर देखील होत असल्याचं पाहायला मिळतं. रशिया-युक्रेनमधील संघर्ष थांबण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील मध्यस्थी केली होती. मात्र, त्यांच्या मध्यस्थीला अद्याप यश आलेलं नाही.
अशातच आता रशिया आणि युक्रेन संघर्षाबाबत आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. कैद्यांच्या अदलाबदलीदरम्यान रशियाने युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. वृत्तानुसार, रशियाने युक्रेनियन शहरांवर ३६७ ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागले, यात १३ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याला युक्रेननेही जोरदार प्रत्युत्तर दिलं.
रशियन सैन्याने युक्रेनच्या काही शहरांवर ३६७ ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागले. रशिया आणि युक्रेन आजपर्यंतच्या संघर्षातील सर्वात मोठा हवाई हल्ला मानला जात आहे. या हल्ल्यात झायटोमिरमधील तीन मुलांसह १३ जणांचा मृत्यू आणि १२ जण जखमी झाले आहेत. यामध्ये कीव, खार्किव, मायकोलाईव, टेर्नोपिल आणि खमेलनित्स्की या ठिकाणी हे हल्ले झाल्याचं सांगितलं जात आहे. या हल्ल्यामुळे पायाभूत सुविधांवर मोठा परिणाम झाला आहे.
दरम्यान, कीवमध्ये ११ जण जखमी झाले आहेत, तर खमेलनित्स्कीमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाल्याचं समोर आलं आहे. दक्षिण युक्रेनमधील मायकोलाईव्ह येथे रशियन ड्रोन हल्ल्यात ७७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात एका निवासी अपार्टमेंट इमारतीचं मोठं नुकसान झालं असून स्फोटामुळे एक खड्डा पडला.
झेलेन्स्की यांनी रशियावर निर्बंध लादण्याची केली मागणी
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशिया विरुद्ध अधिक कडक निर्बंध लादण्याची मागणी केली आहे. तसेच यावेळी झेलेन्स्की यांनी असंही म्हटलं की, अमेरिकेचं मौन आणि जगातील इतरांचं मौन पुतिन यांना प्रोत्साहन देत असल्याचं दिसतं. तसेच दबावाशिवाय काहीही बदलणार नाही आणि रशिया आणि त्याचे सहयोगी देश पाश्चात्य देशांमध्ये अशा हत्यांसाठी फक्त सैन्य उभारतील, असंही म्हटलं.
दरम्यान, दुसरीकडे रशियाने दावा केला आहे की, त्यांनी केवळ चार तासांत ९५ युक्रेनियन ड्रोन पाडले. त्यापैकी १२ मॉस्कोजवळ अडवले गेले. कारण संघर्ष कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. शांतता आणि चर्चेचा मार्ग मोकळा करण्यासाठी युक्रेन ३० दिवसांच्या युद्धबंदीसाठी आग्रह धरत असताना हे हल्ले झाले आहेत. हिंसाचाराच्या दरम्यान दोन्ही बाजू कैद्यांची देवाणघेवाण करत आहेत. प्रत्येकी १,००० लोकांची अदलाबदल करण्यात येत आहे.