आपल्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना दहशतवादी संघटनेशी केल्याने सलमान खुर्शीद वादात सापडले आहेत. त्यांनी शनिवारी उत्तर प्रदेशातील संभल येथील कल्की धाम येथे आयोजित कार्यक्रमात स्पष्टीकरण दिले. मी हिंदुत्व आणि आयसीस एकच आहेत असं म्हटलं नसून दोन्ही एकसारखे असल्याचं म्हटलंय, असं सलमान खुर्शीद म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संभलमध्ये आयोजित कार्यक्रमात काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद म्हणाले की, “दहशतवादी संघटना आयसीस आणि हिंदुत्व एकच आहेत असे मी माझ्या पुस्तकात म्हटले नाही. पण दोन्ही एकसारख्या आहेत, असं मी म्हटलंय. ISIS आणि बोको हराम इस्लाम धर्माचा गैरवापर करतात, असंही मी म्हटलंय. परंतु इस्लामच्या अनुयायांपैकी कोणीही यावर आक्षेप घेतला नाही. मी त्यांच्या धार्मिक भावना दुखावत आहे, असे कोणीही म्हटले नाही.”

“काही लोक हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते हिंदू धर्माचे शत्रू आहेत आणि त्यांना भीती वाटते की त्यांचे सत्य समोर येईल. त्यांचे सत्य उघड करणाऱ्या कोणत्याही पुस्तकावर ते बंदी घालतील. जर मला कोणत्याही धर्मापासून अडचण असती तर मी इथे आलो नसतो. माझा विश्वास आहे की हिंदू धर्म जगात शांततेचा प्रसार करतो, असं खुर्शीद म्हणाले.

यादरम्यान काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी हे पुस्तक इंग्रजीत लिहिल्याबद्दल मला वाईट वाटत असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांनी नाव न घेता भाजपावर निशाणा साधला. ते इंग्रजीत थोडे कच्चे वाटतात. पण इंग्रजी समजत नसेल तर भाषांतर करून घ्या. मी कोणत्याही धर्मावर भाष्य केलेले नाही, असं म्हणत खुर्शीद यांनी भाजपाला टोला लगावला.

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी लिहिलेल्या ‘सनराइज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. ‘द सॅफ्रॉन स्काय’ या पुस्तकाच्या सहाव्या प्रकरणामध्ये असं म्हटलंय की, हिंदुत्वाच्या नव्या मार्गाने सनातन धर्म आणि ऋषीमुनींचा प्राचीन हिंदू धर्म बाजूला सारला जात असून ते इस्लामिक जिहादी संघटना बोको हराम आणि ISIS प्रमाणे आहे. दरम्यान, या ओळींवरून भाजपाने काँग्रेसवर जोरदार टीका केली असून काँग्रेस पक्ष द्वेषाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khurshid explanation on allegations of comparing hindutva with a isis and boko haram hrc