Sambit Patra Remark : “भगवान जनन्नाथ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त आहेत”, असं वक्तव्य भाजपाचे प्रवक्ते आणि लोकसभेचे उमेदवार संबित पात्रा यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. पात्रांच्या वक्तव्यामुळे भाजपावर टीका होऊ लागली आहे. एका ओडिया वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पात्रा यांनी भगवान जगन्नाथांबद्दल हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पात्रांच्या या वक्तव्यामुळे विरोधक भाजपाला घेरण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.

संबित पात्रा यांना भारतीय जनता पार्टीने पुरी या लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. दरम्यान, एका मुलाखतीत त्यांनी भगवान जगन्नाथ यांचा पंतप्रधान मोदींचे भक्त असा उल्लेख केला. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. त्यानंतर पात्रा यांनी आता माफी मागितली आहे. पात्रा म्हणाले, “मी तीन दिवसांचा उपवास करून पश्चाताप करणार आहे.”

संबित पात्रा यांनी सोमवारी (२० मे) रात्री एक वाजता समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “आज महाप्रभू श्री जगन्नाथ यांच्याबद्दल बोलताना मी चुकीचं वक्तव्य बोलून गेलो. त्या वक्तव्यामुळे माझ्या अंतर्मनाला वेदना झाल्या आहेत. मी प्रभू जगन्नाथांच्या चरणी माझं मस्तक लीन करून माफी मागतो. पश्चाताप करून मी माझी चूक सुधारण्यासाठी पुढचे तीन दिवस उपोषण करणार आहे. मुलाखतीत बोलताना माझी जीभ घसरली आणि माझ्या तोंडून ते वक्तव्य निघून गेलं. माझ्याकडून मोठी चूक झाली.”

संबित पात्रांच्या वक्तव्यानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी संबित पात्रा यांच्यावर जोरदार टीका केली. पटनायक म्हणाले, महाप्रभू श्री जगन्नाथ हे संपूर्ण विश्वाचे भगवान आहेत. अशा महाप्रभूंना एका व्यक्तीचा भक्त म्हणणे म्हणजे ईश्वराचा अपमान आहे. पात्रा यांच्या या वक्तव्यामुळे जगभरातील जगन्नाथ भक्त आणि ओडिया लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. भगवान जगन्नाथ हे ओडिया अस्मितेचे प्रतिक आहेत. त्यामुळे संबित पात्रा यांनी भगवान जगन्नाथांबद्दल केलेलं वक्तव्य निषेधार्ह आहे.

हे ही वाचा ?? “त्यांनी शिंदेंना सलाम ठोकणं मला पटलं नाही”, पत्नीच्या वक्तव्यावर गजानन कीर्तिकर म्हणाले, “माझ्यावर…”

संबित पात्रा काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांसह विरोधकांकडून टीका होऊ लागल्यानंतर संबित पात्रा म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या यशस्वी रोड शोनंतर मी अनेक वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या. या मुलाखतींवेळी मी अनेक ठिकाणी म्हणालो की, पंतप्रधान मोदी भगवान जगन्नाथांचे भक्त आहेत. परंतु, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मी म्हणालो, भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त आहेत. कधी-कधी माणसाची जीभ घसरते. त्यामुळे माझ्या त्या वक्तव्याला निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दा बनवू नये.”