दिल्ली इंदरलोक मेट्रो स्थानकावर विचित्र अपघात घडला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय. रिना असं या महिलेचं नाव असून तिच्या मेंदू आणि छातीला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाने दिली. दरम्यान मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त या घटनेची सखोल चौकशी करणार आहेत, असं दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीसीटीव्ही फुटेजनुसार, स्थानकावर मेट्रो रेल्वे आल्यानंतर एक महिला प्रथम कोचमध्ये चढली. मात्र, तिचा मुलगा फलाटावरच राहिला. त्यामुळे ती पुन्हा मागे फिरली. ती मागे फिरत असतानाच मेट्रोची दारे बंद होत होती, तेवढ्यात तिची साडी मेट्रोच्या बंद दारात अडकली. एवढ्यात मेट्रो पुढे जाऊ लागल्याने तीही मेट्रोच्या दिशेने खेचली गेली. मेट्रो रेल्वे स्थानकातून बाहेर पडताच ही महिला रुळांवर आदळली. दुपारी १. ०४ मिनिटांनी ही घटना घडली.

दरम्यान, या गंभीर जमखी महिलेला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तिथे व्हेंटिलेटर नसल्याने तिला तिथे प्रवेश नाकारण्यात आला. दीपचंद बंधू रुग्णालयाने तिला उपचारांसाठी नकार दिल्यानंतर तिला राम मनोहर लोहिया रुग्णालय आणि लोकनायक रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तिथेही तिच्यावर उपचारांसाठी नकार दिला. शेवटी तिला सफदरजंग येथे दाखल करण्यात आले.

तिच्यावर रुग्णालयात उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले, महिलेला रुग्णालयात दाखल केलं तेव्हा तिची प्रकृती गंभीर होती. तिच्या मेंदूला मार लागला होता. तसंच, डोक्याच्या उजव्या बाजूला फ्रॅक्चरदेखील झालं होतं. छातीला मार लागल्याने श्वासोच्छवासासही अडचण येत होती. दरम्यान, या महिलेला शनिवारीच मृत्यू झाला.

रिनाच्या पतीचे २०१४ मध्ये निधन झाले होते. तेव्हापासून ती नांगलोई येथे भाजी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. तिच्या पश्चात ११ वर्षांचा मुलगा हितेन आणि १३ वर्षांची मुलगी रिया असा परिवार आहे. रिना तिच्या मुलासोबत एका लग्नाला जात होती, तेव्हा हा अपघात घडला.

दरम्यान, दिल्ली मेट्रो प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे. दरवाजा उघडला असता तर रिनाचा जीव वाचला असता, असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. रिनाच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई देण्यास दिल्ली मेट्रो प्रशासनाने मान्यता दिली आहे.

तसंच, मेट्रो ट्रेन सेन्सर्सने सुसज्ज आहेत, जे कोणत्याही प्रकारचा अडथळा आल्यास दरवाजे आपोआप उघडले जातात. दिल्ली मेट्रोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सेन्सर निकामी झालेले नाहीत. फक्त २५ मिलिमीटरपेक्षा जाडीचे कापड अडकल्यास यंत्रणा त्याबाबतचा संदेश देतात. साडी त्यापेक्षाही पातळ होती, त्यामुळे दरवाजे आपोआप उघडू शकले नाहीत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sari stuck in metro door woman gets dragged along platform dies sgk