Saudi Arabia Bus Accident 45 umrah pilgrims from Hyderabad killed : सौदी अरेबियातील मदिना शहराजवळ झालेल्या बस अपघातात ४४ यात्रेकरुंचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (१८ नोव्हेंबर) मध्यरात्री घडली. मृतांमधील ४२ जण तेलंगणा राज्यातील असल्याची महिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार चालू आहेत. या दुर्घटनेत हैदराबादमधील एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांमधील १८ सदस्य दगावले आहेत.

तेलंगणामधील ४२ यात्रेकरू दोन स्थानिकांसह बसने मक्केहून मदिनेला जात होते. मदिनापासून ४० किलोमीटर अलीकडे मुफ्रीहाट स्थानकाजवळ त्यांची बस रस्त्याच्या कडेला थांबली होती. त्याच वेळी एक डिझेलचा टँकर बसला धडकला. स्थानिक वेळेनुसार रात्री ११ च्या सुमारास (भारतीय वेळेनुसार मध्यरात्री दीड वाजता) हा अपघात झाला. या अपघातामुळे भीषण स्फोट होऊन बस व टँकरने पेट घेतला. या अपघातात ४२ भाविकांसह अन्य दोन स्थानिक नागरिक मृत्युमुखी पडल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. तर बचावलेल्या एका भाविकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

एकाच कुटुंबातील १८ सदस्यांचा मृत्यू

या अपघातामुळे हैदराबाद शहर हादरलं आहे. मृतांच्या नातेवाईकांना मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचण येत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या मृतांमध्ये हैदराबादमधील एकाच कुटुंबातील १८ सदस्यांचा मृत्यू झाला आहे. या कुटुंबातील एक सदस्य मोहम्मद आसिफ यांनी सांगितलं की “माझी मेहुणी, मेहुणा, त्यांचा मुलगा, तीन मुली आणि त्यांची मुलं उमराहसाठी सौदी अरेबियाला गेले होते. त्यांनी उमराह पूर्ण केली. तिथून ते मदिनाला जात होते. त्याचवेळी हा अपघात झाला. ते सर्वजण शनिवारी परतणार होते.”

मृतांपैकी सहा जणांची ओळख पटवण्यात यश आलं असून नसीरुद्दीन (७०), त्यांची पत्नी अख्तर बेगम (६२), त्यांचा मुलगा सलाउद्दीन (४२), मुली अमीना (४४), रिझवाना (३८) आणि शबाना (४०) अशी त्यांची नावं आहेत. सलाउद्दीन यांची पत्नी व तिन्ही मुलींचे पती, तसेच या चारही दम्पत्यांची मुलं या अपघातात दगावली आहेत. आसिफ यांनी या अपघात प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच दोषींवर कारवाई व्हावी असंही म्हटलं आहे.

दरम्यान, हैदराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार म्हणाले, “या अपघातात ४५ भारतीयांचा मृत्यू झाला असून त्यांच्यापैकी बहुतेक जण हैदराबादचे आहेत. सर्वांचा होरपळून मृत्यू झाला असल्यामुळे मृतदेहांची ओळख पटवणं कठीण असल्याने सौदी अरेबियन अधिकाऱ्यांनी अद्याप मृतांची अधिकृत संख्या जाहीर केलेली नाही.”