SDM Chotu Lal Sharma Bhilwara Slap Row : राजस्थानमधील प्रतापगडच्या एका उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या (एसडीएम) अरेरावीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मध्य प्रदेशमधील एका पेट्रोल पंपावर कारमध्ये सीएनजी भरताना आपल्याआधी दुसऱ्या व्यक्तीच्या कारमध्ये सीएनजी भरल्याच्या रागातून प्रतापगडचे एसडीएम छोटू लाल शर्मा यांनी पेट्रोल पंपावरील दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. प्रत्युत्तरात कर्मचाऱ्यांनी देखील शर्मा यांच्या कानशिलात लगावली. या घटनेचं सीसीटीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर शर्मा यांच्यावर बरीच टीका झाली. त्यानंतर आता शर्मा यांच्या पत्नीने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार अजमेर-भीलवाडा राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली आहे. छोटू लाल शर्मा हे २१ ऑक्टोबर रोजी कुटुंबासमवेत जयपूरवरून प्रतापगडला जात होते. या रस्त्यावरील जसवंतपुरा येथील एका पेट्रोल पंपावर त्यांनी सीएनजी भरण्यासाठी कार थांबवली. या घटनेच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसतंय की आधी कार थांबली. त्यानंतर शर्मा यांच्या कुटुंबातील सदस्य कारमधून बाहेर पडले. त्यानंतर एक सीएनजी कर्मचारी कारमध्ये सीएनजी भरण्यासाठी पुढे आला. परंतु, बराच वेळ प्रयत्न करून कारची फ्यूल कॅप ओपन झाली नाही. त्यानंतर तो रांगेत मागे उभ्या कारमध्ये सीएनजी भरू लागला.

नेमकं काय घडलं?

पंपावरील कर्मचारी आपली कार सोडून मागच्या कारमध्ये सीएनजी भरतोय हे पाहून शर्मा संतापले. त्यानंतर शर्मा कारमधून उतरले आणि त्यांनी कर्मचाऱ्याला सुनावलं. ते म्हणाले, “मी इथला एसडीएम आहे. तुला दिसत नाही माझी गाडी उभी आहे. एसडीएमला हात लावतोयस तू. तुला माहितीय का मी कोण आहे?” त्याचदरम्यान त्यांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. शर्मा कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत होते. त्यानंतर कर्मचाऱ्यानेही शर्मा यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर आणखी एक कर्मचारी तिथे आला. यातून वाद वाढला. त्यावर शर्मा यांनी दुसऱ्या कर्मचाऱ्याच्याही कानशिलात लगावली. त्या कर्मचाऱ्यानेही शर्मा यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं.

एसडीएमच्या पत्नीची पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार

या घटनेनंतर पोलिसांनी पेट्रोल पंपावरील तीन कर्मचारी, दीपक माली, प्रभू लाल कुमावत, राजा शर्मा यांना अटक केली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला असून छोटू लाल शर्मा यांच्यावर बरीच टीका झाली. दरम्यान, आता शर्मा यांची पत्नी दीपिका व्यास यांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. तसेच पंपावरील कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याचा देखील आरोप केला आहे.

एसडीएमच्या पत्नीचं म्हणणं काय?

दीपिका यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे की “पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने त्यांना डोळा मारला, ‘क्या माल लग रही है’ अशा शब्दांत शेरेबाजी केली. त्यामुळे माझे पती संतापले आणि ते त्या कर्मचाऱ्यावर ओरडले. त्यानंतर तो दुसऱ्या कारमध्ये सीएनजी भरू लागला. त्यावर माझ्या पतीने आक्षेप घेतला. त्यामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी संतापून माझ्या पतीवर हल्ला केला.”