संपूर्ण जगावर करोनाचं सावट आहे. भारतात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लॉकडाउनची स्थिती पुन्हा ओढावू नये यासाठी प्रत्येक जण काळजी घेताना दिसत आहे. तसेच सरकारनं लसीकरणावर जोर दिला आहे. मात्र समाजातील अनेक घटक अजूनही लसीकरणापासून वंचित आहेत. तृतीयपंथी समाजही या घटकांपैकी एक आहे. या समुदायातील लोकांना देखील प्राधान्याने लस मिळायला हवी यासाठी सिरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी ट्वीट केलं आहे.

तृतीयपंथी कार्यकर्त्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी अध्यक्ष अदर पूनावाला तिथे उपस्थित होते. अदर पूनावाला यांनी लक्ष्मी नारायण त्रिपाठी लस घेत असल्याचा फोटो ट्वीट केला आहे. “मला नेहमीच असं वाटत आलं आहे की, आरोग्यसेवा आणि प्रतिष्ठा हे मूलभूत मानवी अधिकार आहेत. मी तृतीयपंथी समाजाला समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना सहकार्य करण्यास उत्सुक आहे”, अशी पोस्ट त्यांनी फोटोवर लिहिली आहे.

तृतीयपंथी समासाठी लक्ष्मी नारायण त्रिपाठी या गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. काही दिवसांपूर्वी लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची भेट घेण्याासठी अखिलेश यादव आले होते. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचा विजय झास, तर देशातील राजकारणात बदल घडेल, असं सांगितलं होतं.