शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे त्यांच्या वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. पुन्हा एकदा त्यांचं असंच एक विधान समोर आलं आहे. शिवहरमध्ये शंकराचार्य स्वामी अविममुक्तेश्वरानंद म्हणाले गोरक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या कोणत्याही पक्षाला किंवा संघटनेला, अगदी एआयएमआयएमलाही पाठिंबा देऊ. शंकराचार्यांच्या या वक्तव्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. हिंदू धर्म आणि हिंदुत्वाच्या नावाखाली मते मागणारे गोरक्षणावर गप्प का आहेत? असा प्रश्न शंकराचार्यांनी उपस्थित केला. शिवहर शहरातील प्रसाद उत्सव विवाह सभागृहात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. गाय ही कोणत्याही विशिष्ट जातीची, पंथाची किंवा पक्षाची नसून संपूर्ण भारताची ओळख दर्शवते यावर शंकराचार्य यांनी भर दिला.

नेमकं काय म्हणाले शंकराचार्य?

रविवारी शिवहरमध्ये बोलताना शंकराचार्य म्हणाले, गोमाता कुठल्याही जात, पंथ, पक्षाची नाही. गोमाता ही संपूर्ण भारताची ओळख आहे. जे लोक हिंदू आणि हिंदुत्वाच्या नावावर मतं मागतात ते त्यांच्या जाहीरनाम्यांमध्ये गो रक्षेचा मुद्दा का उपस्थित करत नाहीत? गो रक्षा करण्यात काय अडचण आहे? गोमातेचं नाव घेऊन राजकारण केलं जातं पण गोमातेच्या सेवेसाठी तुम्ही काय करत आहेत हे देशाला जाणून घ्यायचं आहे असं शंकराचार्य म्हणाले.

..तर आम्ही एमआयएमलाही पाठिंबा देऊ

आमची निष्ठा कुठल्याही राजकीय पक्षाशी नाही. आमची निष्ठा गोमाता आणि सनातन धर्माशी आहे. आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही किंवा कुणाच्या बाजूनेही नाही. गोरक्षणाचा मुद्दा जो मांडेल त्या पक्षाला आम्ही पाठिंबा देऊ. उद्या एमआयएमने हा मुद्दा आणला तर त्यांनाही प्रसंगी पाठिंबा देऊ. गोमाता भारतीय संस्कृती, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण यांचा आधारस्तंभ आहे असंही शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं आहे.  गाय ही कोणत्याही विशिष्ट जातीची, पंथाची किंवा पक्षाची नसून संपूर्ण भारताची ओळख दर्शवते यावर शंकराचार्य यांनी भर दिला.

शिवहर नगर परिषेदचं शंकराचार्यांनी केलं कौतुक

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी शिवहर नगर परिषदेने निर्णयाचं कौतुक केलं. सभापती राजन नंदन सिंह आणि इतर नगरसेवकांनी आवाजी मतदानाने गोमातेला नगर मातेचा दर्जा दिला हा खूपच चांगला निर्णय आहे असं शंकराचार्य म्हणाले. तसंच शिवहर नगर परिषदेने जो निर्णय घेतला आहे तो देशभरातील नगर परिषदा आणि महापालिकांसाठी आदर्श निर्णय आहे असंही शंकराचार्यांनी म्हटलं आहे. तसंच गोरक्षा ही फक्त घोषणा देऊन नाही तर त्या पद्धतीचं कर्तव्य पार पाडूनही झाली पाहिजे असंही शंकराचार्यांनी म्हटलं आहे.