खासगीकरणाच्या सरकारी धोरणावर सडकून टीका करणारे भाजपाचे खासदार वरुण गांधी यांच्या टीकेकडे तरी केंद्रातील मोदी सरकारने लक्ष द्यावं असं शिवसेनेनं म्हटलंय. खासगीकरणामुळे भविष्यात नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण होईल, सर्व कंपन्या खासगी झाल्या तर सर्वसामान्यांना मुलांना नोकऱ्या कोण देणार असे काही प्रश्न वरुण गांधी यांनी नुकतेच एका कार्यक्रमामध्ये उपस्थित केले होते. वरुण गांधींनी केलेल्या या टीकेवरुन शिवसेनेनं भाजपाच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेत असणाऱ्या सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

“केंद्र सरकारने विविध सरकारी उपक्रम आणि बँकांच्या खासगीकरणाचा धडाकाच लावला आहे. त्यावरून विरोधकांसह सर्वच पातळ्यांवर टीका होत असली तरी केंद्रातील सत्ताधारी त्यावर सोयिस्कर मौन बाळगून आहेत. बोलायचेही नाही आणि जे करायचे आहे ते सोडायचेदेखील नाही, असेच एकंदरीत केंद्र सरकारचे खासगीकरणाबाबतचे धोरण आहे. मात्र आता भाजपचेच एक खासदार वरुण गांधी यांनीही त्यावरूनच स्वपक्षाला घरचा आहेर दिला आहे. सरकारचे खासगीकरणाचे आणि ई-कॉमर्सचे धोरण देशविरोधी असून खासगीकरणामुळे कोटय़वधी लोकांचे रोजगार धोक्यात आले आहेत, असे वरुण गांधी म्हणाले,” असा संदर्भ शिवसेनेनं दिलाय.

“उत्तर प्रदेशमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी केंद्राच्या धोरणावर सडकून टीका केली. ‘केंद्र सरकार खासगीकरणाच्या नावावर सगळेच विकून टाकत आहे. त्यामुळे कोटय़वधींच्या रोजगारावर तर गदा आलीच आहे, परंतु अर्थव्यवस्थादेखील धोक्यात आली आहे,’ असे वरुण गांधी म्हणाले. सरकारी नोकऱ्या देण्याऐवजी आहेत त्या काढून घेण्याचे उफराटे धोरण सध्या राबविले जात आहे, असेही ते म्हणाले,” असं शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलंय.

नक्की पाहा >> Video: “आम्हाला तुम्ही वेडं समजलात का? मोदींना मत देणार नाही”; मोदींच्या सभेमधून बाहेर पडताना महिला संतापल्या

“वरुण गांधी हे नेहरू-गांधी परिवारातील असले तरी ते भाजपाचे खासदार आहेत. त्यांच्या आई मनेका गांधी यादेखील बरीच वर्षे भाजपाच्याच खासदार राहिल्या आहेत. मोदी सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषविले आहे. त्यामुळे वरुण गांधी यांची टीका त्यांच्या पक्षधुरिणांना झोंबणारी नक्कीच आहे. राहुल गांधी यांची टीका ‘राजकीय’ वगैरे असल्याची बतावणी भाजपावाले नेहमीच करीत असतात. मग आता त्यांच्याच पक्षाचे खासदार वरुण गांधी यांनी केलेल्या टीकेबद्दल त्यांचे काय म्हणणे आहे?,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलाय.

नक्की वाचा >> “विमानतळं, MTNL, BSNL असं सगळं काही विकलं तर सामान्यांना नोकऱ्या कोण देणार?”

लेखात पुढे, “अर्थात, त्यावरही वरुण गांधी सध्या ‘नाराज’ वगैरे आहेत. त्या वैफल्यातून ते स्वपक्ष आणि सरकारवर टीका करीत आहेत, अशी मखलाशी भाजपची मंडळी करतील. मागील काही दिवसांतील बातम्यांवरून चित्र जरी तसे दिसत असले तरी वरुण गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे, मुद्द्यांचे काय? पक्षाचे धोरण म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असे काही ठरले असेल तर तो भाजपाचा पक्षांतर्गत मामला आहे. त्यावर कोणी काही टिकाटिप्पणी करण्याचे कारण नाही. वरुण गांधी काय किंवा इतर काय, त्यांनी वस्तुस्थितीला धरून केलेल्या टीकेवर तरी काही टिप्पणी कराल की नाही?,” असं सवाल विचारण्यात आलाय.

“केंद्राच्या खासगीकरणाच्या धोरणावरून उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे सरकार म्हणून तुम्ही जनतेला द्यायलाच हवीत. कारण सामान्य जनतेच्याही मनात सरकारी कंपन्यांच्या या ‘बंपर सेल’बाबत हेच प्रश्न आहेत. विरोधक काय किंवा सुब्रमण्यम स्वामी, वरुण गांधी यांच्यासारखे भाजपाचे ‘स्वपक्षीय निंदक’ काय, हे जनतेच्या मनातील खदखदच चव्हाट्यावर मांडत असतात. परंतु त्यांचे निराकरण करण्याऐवजी त्यांना राष्ट्रद्रोही, पक्षद्रोही म्हणत दुर्लक्ष करायचे. सोयिस्कर मौन बाळगायचे असे धोरण सध्या केंद्रातील सरकारचे आहे,” अशी टीका शिवसेनेनं केलीय.

नक्की वाचा >> “देश विकलात, पण अयोध्या विकता येणार नाही, कारण…”; शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल

“निर्गुंतवणुकीतून १.७५ लाख कोटी सरकारी तिजोरीत भरायचे असे म्हणे केंद्र सरकारचे ‘लक्ष्य’ आहे. सरकारी तिजोरी भरण्याबद्दल कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही, पण त्यासाठी सामान्य जनतेच्या खिशांना का कात्री लावीत आहात? त्यांच्या रोजगारावर का गदा आणीत आहात? मागील ७० वर्षांत देशाने जे कमावले ते सगळे ‘मोडीत’च काढायचे, असे ‘मोदी’ सरकारने ठरविलेले दिसत आहे,” असा टोला शिवसेनेनं लगावलाय.

“या सर्व पायाभूत सुविधा म्हणजे देशाचा हिरेजडित मुकुट आहे आणि तो मोदी सरकारने विकायला काढला आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी मध्यंतरी केली होती. आता खासदार वरुण गांधी यांनीही त्याच मुद्यावर बोट ठेवले आहे. खासगीकरणाच्या नावावर सगळेच विकले जात आहे, अशा शब्दांत वरुण गांधी मोदी सरकारवर बरसले आहेत,” असं शिवसेना म्हणलीय.

“राहुल गांधी किंवा इतरांकडे तुम्ही दुर्लक्ष करता हे ठीक, पण वरुण गांधी हे तुमच्याच पक्षाचे आहेत. त्यांनीही तेच प्रश्न उपस्थित केले आहेत. तेव्हा आता तरी मौन सोडा. कारण तुम्ही कितीही झाकायचा प्रयत्न केलात तरी खासगीकरणाचा ‘कोंबडा’ रोज आरवतोच आहे, हे तरी लक्षात घ्या,” असा चिमटा शिवसेनेनं लेखाच्या शेवटी काढलाय.