पीटीआय, जेरुसलेम
इस्रायलमधील जेरुसलेमच्या उत्तर भागात एका वर्दळीच्या चौकात असलेल्या बस थांब्यावर हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला आणि १२ जण जखमी झाले, असे इस्रायली पोलीस आणि आपत्कालीन बचाव पथकांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोरांनी बसथांब्यावर वाट पाहणाऱ्या नागरिकांवर गोळ्या झाडल्या, तर इस्रायली माध्यमांनी वृत्त दिले की हल्लेखोर प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये चढले आणि आत गोळीबार केला. घटनास्थळी असलेल्या एका सुरक्षा अधिकाऱ्याने आणि एका नागरिकाने हल्लेखोरांना गोळ्या घालून ठार मारले, असे पोलिसांनी सांगितले.
या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही चित्रणांमध्ये सकाळच्या गर्दीच्या वेळी गर्दीच्या चौकात असलेल्या बस थांब्यावरून डझनभर लोक पळून जाताना दिसत आहेत. काही नागरिक जखमी झाले होते आणि रस्त्यावर आणि बसथांब्यावरील फूटपाथवर बेशुद्ध पडले होते. या परिसरात अतिरिक्त हल्लेखोर किंवा स्फोटके पेरलेली असू शकतात, असा शोध घेण्यासाठी सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून या परिसरातील सुरक्षा वाढविण्यात येणार असून पश्चिम किनारपट्टीवरील पॅलेस्टिनींची वस्ती असलेल्या अनेक गावांना वेढा घालण्यात येत आहे, असे इस्रायली सैन्याने सांगितले.
पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जेरुसलेममधील गोळीबारीचा तीव्र निषेध केला. मृतांबाबत शोक व्यक्त केला आणि जखमींच्या प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना केली. भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो आणि दहशतवादाला शून्य सहनशीलतेच्या धोरणावर ठाम आहे, असे पंतप्रधान म्हणाले.