पीटीआय, भोपाळ
दहशतवाद्यांचे छुपे युद्ध चालणार नाही आणि गोळ्यांना तोफगोळ्यांनी उत्तर दिले जाईल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेल्या प्रत्युत्तरानंतर ‘सिंदूर’ हे शौर्याचे प्रतीक झाले असल्याचे ते म्हणाले. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’चे वर्णन देशाच्या इतिहासातील सर्वात मोठे आणि सर्वात यशस्वी दहशतवादविरोधी मोहीम म्हणून त्यांनी केले.

महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त भोपाळमध्ये ‘लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तीकरण महासंमेलना’स पंतप्रधान मोदी संबोधित करीत होते. त्यांनी या या जयंतीनिमित्त एक टपाल तिकिट आणि ३०० रुपयांचे नाणेदेखील जारी केले. या वेळी त्यांनी अहिल्याबाई यांच्या ‘आपल्याकडे जे काही आहे ते जनतेने दिलेले कर्ज आहे, जे आपल्याला परत करावे लागेल’ या वाक्याची आठवण करून देत सरकार याच मंत्राचे पालन करत असून ‘नागरिक देवो भव:’ हाच सरकारचा मंत्र असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सरकारच्या प्रत्येक मोठ्या योजनेच्या केंद्रस्थानी महिला आहेत, हे त्यांनी नमूद केले.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केवळ भारतीयांचे रक्त सांडवले नाही तर आपल्या संस्कृतीवरही हल्ला केला. त्यांनी आपल्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी भारताच्या महिला शक्तीला आव्हान दिले. हे आव्हान दहशतवाद्यांसाठी आणि त्यांच्या म्होरक्यांसाठी मृत्युघंटा ठरले.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

महिलांच्या सक्षमीकरणावर भर

लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये एकूण जागांपैकी एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याच्या उद्देशाने असलेल्या नारी शक्ती वंदना कायद्याबद्दलही पंतप्रधानांनी भाष्य केले. यंदा ७५ महिला संसदेच्या सदस्य झाल्या आहेत. ही संख्या वाढवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. सरकारच्या प्रत्येक मोठ्या योजनेच्या केंद्रस्थानी महिला आहेत, असे त्यांनी नमूद केले. नौकेद्वारे जग प्रदक्षिणा करून भारतात परतलेल्या लेफ्टनंट कमांडर रूपा ए. आणि दिलना के. यांचीही त्यांनी स्तुती केली.