हरिद्वार : कावड यात्रा अखेरच्या टप्प्यात आली असतानाच कावडियांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. रविवारी दिल्ली-डेहराडून महामार्ग, गंगा कालवा रस्ता या मार्गावर विविध अपघातांच्या घटनांत सहा कावडियांचा मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले.
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील दिल्ली-हरिद्वार राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातांत दोन कावडियांचा मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. बारला पुलाजवळ दोन मोटारसायकलींची टक्कर होऊन एका २८ वर्षीय कावडियाचा मृत्यू झाला. तो कैरानाहून हरिद्वारला जात असताना हा अपघात झाला. दुसऱ्या घटनेत सलीमपूर बाह्यवळण मार्गावर दोन दुचाकींची धडक होऊन आणखी एका कावडियाला मृत्यूला सामोरे जावे लागले.
गाझियाबादमध्ये भरधाव रुग्णवाहिकेने दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातात तीन कावडियांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाले. दिल्ली-मेरठ मार्गावरील कद्रब्राजवळ शनिवारी रात्री ११.४५ वाजता हा अपघात घडला. मेरठमधील रुग्णालयात एका रुग्णाला सोडल्यानंतर चार कावडिया हरिद्वारला जात असतानाच विरुद्ध दिशेने रुग्णवाहिकेने येऊन त्यांना धडक दिली.
रुग्णवाहिका जप्त करण्यात आली आहे आणि चालकाला अटक करण्यात आली आहे. ओडिशातही टेम्पोने कावडियांना घेऊन जाणाऱ्या ऑटोरिक्षाला धडक दिली, त्यात एका महिला कावडियाचा मृत्यू झाला. उत्तराखंडच्या न्यू टिहरी येथे गंगोत्रीहून परतताना ट्रक उलटल्याने १४ कावडिया जखमी झाले. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे, असे पोलिसांनी सांगितले.