इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थीनीने आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षकाला अटक केली असून या मुलीने आत्महत्येआधी चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीतून आत्महत्येचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. शाळेत घडलेल्या अपमानजनक घटनेमुळे तिने आत्महत्या केल्याचं चिठ्ठीत लिहिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “तेटुलमारी येथील सेंट झेवियर्स शाळेत मुलगी सकाळी साडेसात वाजता नेहमीप्रमाणे गेली. परंतु, थोड्याच वेळात ती घरी परतली. तिने कपाळावर टिकली लावली होती, म्हणून शिक्षकांनी तिच्या कानाखाली लगावली. त्यामुळे मुलगी नाराज झाली होती”, अशी माहिती मुलीच्या आईने पोलिसांना दिला. घरी आल्यानंतर मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. तसंच, तिने आत्महत्येआधी सुसाईड नोटही लिहिली आहे.
शिक्षक आणि मुख्यध्यापकांविरोधात गुन्हा दाखल
सुसाईड नोटमध्ये तिने तिच्या आत्महत्येला शाळेला आणि शिक्षकांना जबाबदार धरले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आईच्या तक्रारीनुसार शिक्षक आणि मुख्यध्यापकांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
सुसाईड नोटमध्ये काय लिहिले?
“शिक्षकांनी सगळ्यांसमोर माझ्या कानाखाली मारली. मला शाळेच्या आवारातून जाण्यास सांगितले. मला याचा राग आला. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे”, असं मुलीने आत्महत्येआधी चिठ्ठीत लिहिलं आहे. तसंच, या चिठ्ठीत तिने शाळेचे शिक्षक आणि मुख्यध्यापकांनाही तिच्या आत्महत्येला जबाबदार धरले आहे.
… अन् ती आम्हाला सोडून गेली
“येत्या काही महिन्यांत माझ्या मुलीचं शालेय शिक्षण पूर्ण होणार होतं. वर्षभरापूर्वीच माझ्या पतीचं निधन झालं. माझी मुलगी आणि माझी दोन मुलं एकाच शाळेत शिकत होती. माझ्या मुलीने कपाळावर टिकली लावली होती. तिने शिक्षकांना पाहताच टिकली काढूनही टाकली होती. पण तरीही सगळ्यांसमोर तिला शिक्षकांनी मारलं. याप्रकरणी ती मुख्यध्यापकांकडे गेली. परंतु मुख्यध्यापकांनीही तिचं ऐकून घेतलं नाही. तसंच तिला तिथून निघून जाण्यास सांगितलं. ती घरी आल्यानंतर तिने सगळी हकिगत मला सांगितली. त्यामुळे मी तिला घेऊन शाळेत गेले. शिक्षकांनी मुलीची माफी मागावी अशी विनंती मी मुख्यध्यापकांना केली. पण मुख्यध्यापकांनी आमची विनंती मान्य केली नाही. त्यामुळे मी माझ्या मुलीची समजूत काढली आणि आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर ती एका कागदावर काहीतरी लिहीत होती. मी तिला याबाबत विचारलं असता ती शाळेचा अभ्यास करत असल्याचं तिने सांगितलं आणि त्यानंतर काहीच वेळात ती आम्हाला कायमचं सोडून गेली”, अशी माहिती मुलीच्या आईने पोलिसांना दिली.