हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर प्रसिद्ध उद्योजक गौतम अदाणी यांना मोठा झटका तर बसलाच शिवाय विरोधकांना मोदी सरकारविरोधात बोलण्यास एक मुद्दाही मिळाला. राहुल गांधी यांनी मागच्याच आठवड्यात लोकसभेत केलेल्या भाषणात सरकारला अदाणी प्रकरणावरून प्रश्नांची सरबत्ती केली. तसंच संयुक्त संसदीय समिती स्थापन करून या प्रकरणी चौकशी करावी अशीही मागणी विरोधकांनी केली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या उत्तराच्या भाषणात अदाणी हे नावही उच्चारलं नाही. त्यानंतर आज अमेरिकेतले अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांनी मोदींवर टीका केली आहे. तसंच मोदींना अदाणी प्रकरणावर बोलावंच लागेल असंही त्यांनी म्हटलं आहे. त्याच सोरोस यांना स्मृती इराणी यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हटलंय स्मृती इराणींनी?
आजच्या घडीला भारताचे आभार मानणाऱ्यांमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत. फ्रान्सचे राष्ट्रपती आणि इंग्लंडचे पंतप्रधान सुद्धा आहेत. भारताने या देशांशी चांगले आर्थिक संबंध जोपासल्याबद्दल हे देश आभार मानतात. जग मंदीच्या काळातून जात असताना आपला देश जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरला आहे. अशावेळी जॉर्ज सोरोस सारखे लोक भारताच्या लोकशाही व्यवस्थेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहेत. जॉर्ज सोरोस यांनी केलेली ही मागणी म्हणजे त्यांना वाटत असेल की आपण मोदींना भारतात झुकवू शकतो. मात्र लोकशाही पद्धतीने निवडलेल्या आपल्या सरकारने अशा उद्योजकांना ठोस उत्तर दिलंच पाहिजे.
भारताची लोकशाही व्यवस्था आणि तिचा पाया प्रचंड मजबूत आहे. अशावेळी या लोकशाही व्यवस्थेला सुरूंग लावण्यासाठी कट आणि षडयंत्र रचली जात आहेत. जो व्यक्ती आर्थिक युद्धाचा अपराधी आहे तो व्यक्ती आज मोदींकडे उत्तर मागतो आहे. अनेक देशांच्या विरोधात दावा करणारे जॉर्ज सोरोस हे आता भारतीय लोकशाही व्यवस्था खिळखिळी करण्यासाठी आरोपांचे मनोरे रचत आहेत असं म्हणत स्मृती इराणी यांनी सोरोस यांना उत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर अशा माणसाला आपल्या देशाने आपल्या एकजुटीतून उत्तर दिलं पाहिजे असंही स्मृती इराणींनी म्हटलं आहे.
स्मृती इराणी पुढे म्हणाल्या की मी या देशाची एक नागरिक आहे. त्याच अनुषंगाने मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते आहे की अशा विदेशी ताकदीच्या विरोधात आपण सगळ्यांनी उभं राहुया. जॉर्ज सोरोस सारखे लोक जेव्हा आपल्या लोकशाही पद्धतीने निवडून दिलेल्या सरकारला आव्हान देतील तेव्हा आपण सगळ्यांनी त्यांचा कडाडून विरोध करूया असंही स्मृती इराणी यांनी स्पष्ट केलं.
कोण आहेत जॉर्ज सोरोस?
जर्मनी येथे होत असलेल्या म्युनिक सुरक्षा संमेलनाच्या आधी जॉर्ज सोरोस यांनी म्युनिक विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलत असताना सदर वक्तव्य केलेलं आहे. तसेच गौतम अदाणी यांच्या अदाणी समूहाने शेअर मार्केटला वेठीस धरल्यामुळे भारताच्या विश्वासार्हतेला कसा तडा गेला? यावरही भाष्य केले. जॉर्ज सोरोस हे ओपन सोसायटी फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांची संपत्ती ८.५ अब्ज डॉलर्स एवढी आहे. लोकशाहीवादी, पारदर्शकतेला प्राधान्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या गटांना ते निधी पुरवत असतात.