Sonam Wangchuk Message from Jodhpur Jail : राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटकेत असलेलेल पर्यावरण कार्यकर्ते व शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी झटणारे सोनम वांगचुक यांनी जोधपूर केंद्रीय कारागृहातून एक संदेश पाठवला आहे. त्यांनी म्हटलं आहे की “अलीकडेच लडाखमध्ये झालेल्या हत्यांप्रकरणी स्वतंत्र न्यायिक चौकशी होईपर्यंत मी तुरुंगात राहायला तयार आहे.”
वांगचुक यांचे वकील मुइस्तफा हाजी व वांगचुक यांचे मोठे भाऊ त्सेतन डॉर्जे ली यांनी नुकतीच तुरुंगात जाऊन सोनम यांची भेट घेतली. यावेळी सोनम वांगचुक यांनी दिलेला संदेश दोघांनी माध्यमांसमोर वाचून दाखवला आणि देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवला.
सोनम वांगचुक यांनी सांगितलं की “मी शारीरिक व मानसिकदृष्ट्या बरा आहे. अनेकजण काळजी व्यक्त करत आहेत, प्रार्थना करत आहेत, त्यासाठी मी सर्वांचा आभारी आहे.”
लडाखमध्ये अलीकडे झालेल्या हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्यांना आदरांजली वाहत वांगचुक म्हणाले, “ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी प्राण गमावले त्यांच्याप्रती मी शोक व्यक्त करतो. जे जखमी झाले आहेत ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. तसेच जे अटकेत आहेत ते लवकर मुक्त व्हावेत अशी आशा बाळगतो.”
आमच्या सहकाऱ्यांच्या हत्या प्रकरणांची न्यायिक चौकशी करावी : वांगचुक
वांगचुक यांनी लडाखमधील हत्या प्रकरणांची स्वतंत्र न्यायिक चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. ते म्हणाले, “आमच्या चार कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. त्याची चौकशी व्हावी. ही चौकशी होईपर्यंत मी तुरुंगात राहायला तयार आहे.”
गांधीवादी मार्गाने आंदोलन चालू ठेवण्याचा इशारा
‘लडाखला राज्याचा दर्जा देणे’ आणि ‘संविधानातील सहाव्या परिशिष्टात लडाखचा समावेश करणे’ या दोन्ही मागण्यांचा वांगचुक यांनी यावेळी पुनरुच्चार केला. तसेच ते म्हणाले, “अॅपेक्स बॉडी लडाखच्या हितासाठी जे निर्णय घेईल त्यात मी त्यांच्याशी पूर्णपणे सहमत असेन. तसेच मी लोकांना शांतता राखण्याचं, एकात्मता जपण्याचं आवाहन करतो. आपला संघर्ष शांततेच्या मार्गाने, गांधीवादी पद्धतीने चालू ठेवण्याचं आवाहन करतो.”
लडाखला राज्याचा दर्जा द्यावा व संविधानातील सहाव्या परिशिष्टात लडाखचा समावेश करावा ही मागणी घेऊन लेह येथे चालू असलेल्या आंदोलनादरम्यान हिंसाचार उसळला होता. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जनता आणखी संतप्त झाली. परिणामी लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
