Anyparna Roy Venice Speech Controversy: चित्रपट दिग्दर्शिका अनुपर्णा रॉय यांना गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच अनुपर्णा रॉय यांनी देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी करून दाखवल्यानंतरही त्यांना काही विशिष्ट गटाकडून लक्ष्य केलं जात आहे. ८२व्या व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक खिताब मिळाल्यानंतर अनुपर्णा रॉय यांनी केलेलं एक भाषण यासाठी कारणीभूत ठरलं आहे. मात्र, आपल्या मुलीनं असं काहीही चुकीचं बोललेलं नाही, असं म्हणत अनुपर्णा यांच्या पालकांनी या संपूर्ण प्रकरणावर उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.
नेमका काय आहे प्रकार?
अनुपर्णा रॉय यांना त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी ८२व्या व्हेनिस चित्रपट महोत्सवामध्ये ओरिझाँटी गटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या अनुपर्णा रॉय या पहिल्याच भारतीय आहेत. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. मुंबईत स्थलांतरित होऊन एकत्र राहणाऱ्या दोन महिलांभोवती या चित्रपटाचं कथानक उभं करण्यात आलं आहे. हा पुरस्कार स्वीकारताना अनुपर्णा रॉय यांनी केलेल्या भाषणात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ भूमिका मांडली. पण त्यावरच आक्षेप घेतला जाऊ लागला.
काय म्हणाल्या होत्या अनुपर्णा रॉय?
अनुपर्णा रॉय यांनी पुरस्कार स्वीकारताना पॅलेस्टाईनमधील लहान मुलांच्या अधिकारांचा मुद्दा मांडला. “जगातल्या प्रत्येक मुलाला शांतता, स्वातंत्र्य, मोकळीक यांचा अधिकार आहे. पॅलेस्टाईनही यासाठी अपवाद नाही. मला माझ्या या विधानासाठी कुणाच्याही टाळ्या नको आहेत. ही एक जबाबदारी आहे. जरा विचार करा आणि पॅलेस्टाईनच्या पाठिशी उभे राहा. असं बोलून मी कदाचित माझ्या देशाला नाराज करेन. पण आता मला त्याने काही फरक पडत नाही”, असं अनुपर्णा रॉय भाषणादरम्यान म्हणाल्या.
ट्रोलिंग, टीका.. रॉय यांच्या पालकांचा उद्वेग
दरम्यान, त्यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर काही गटांकडून टीका केली जात आहे. यावर आता रॉय यांच्या पालकांनी त्यांची पाठराखण केली आहे. “आमच्या मुलीने अवघ्या देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केल्यानंतर जे काही घडतंय, ते पाहून आम्ही प्रचंड विचलित झालो असून आम्हाला काळजी वाटू लागली आहे. माझ्या मुलीने पॅलेस्टाईनमधील मुलांवरील अन्यायाबाबत मांडलेल्या भूमिकेबद्दल तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. वेगवेगळ्या समाजातले लोक तिच्यावर टीका करत आहेत. विशिष्ट समाजाची बाजू घेतल्याचा आरोप करत आहेत. आम्ही तिच्याशी बोललो. ती सध्या मुंबईत असून कामात व्यग्र आहे. पण तीदेखील या सगळ्या प्रकरणामुळे दु:खी झाली आहे”, असं अनुपर्णा यांचे वडील ब्रह्मानंद रॉय यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.
“तुम्ही तिचं भाषण काळजीपूर्वक ऐकायला हवं. ती म्हणाली, ‘प्रत्येक मुलाला शांतता, स्वातंत्र्य व मोकळिकीचा अधिकार आहे आणि पॅलेस्टाईनही त्यासाठी अपवाद नाही’. ती कोणत्याही एका समाजाबद्दल बोललेली नाही. ती जगातल्या प्रत्येक लहान मुलाबद्दल बोलली आहे. तिने काहीही चुकीचं म्हटलेलं नाही”, असंही ते म्हणाले.
अनुपर्णा रॉय यांच्या आईचा त्रागा
दरम्यान, अनुपर्णा रॉय यांच्या आई मनिषा रॉय यांनीदेखील यावर तीव्र नापसंती व्यक्त केली. “ते सगळे तिच्यावर का टीका करत आहेत? लहान मुलांच्या हिताबद्दल बोलणं चुकीचं आहे का? तिने फक्त तिचं मत व्यक्त केलं. प्रत्येकाला स्वत:चं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तिने आपल्या देशाला अभिमान वाटावा असं काम केलंय. अशा व्यक्तीबरोबर समाजातील काही लोक असं कसं वागू शकतात?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.