RRB-NTPC Exam Controversy In Bihar : बिहारमध्ये सलग तिसऱ्या दिवशी गोंधळाची स्थिती कायम आहे. भारतीय रेल्वेच्या आरआरबी एनटीपीसी आणि ग्रुप डी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप करत विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी परीक्षा घोटाळ्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाठीचार्जचाही आरोप केलाय. गयामध्ये उद्रेक झालेल्या तरूणांनी प्रजासत्ताक दिनी दगडफेक करत ट्रेनला आग लावल्याचीही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गयामध्ये आंदोलक विद्यार्थ्यांनी ट्रेनला आग लावल्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आलं. दरम्यान, रेल्वे प्लॅटफॉर्मवर सगळीकडे केवळ दगडच दिसत आहेत. आंदोलक विद्यार्थ्यांनी श्रमजीवी एक्सप्रेसचं मोठं नुकसान केलं. तसेच भभुआ-पाटणा इंटरसिटी एक्सप्रेसला आग लावली. सरकारविरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थी सातत्याने दगडफेक करत आहेत. विद्यार्थ्यांमधील असंतोष वाढतच असल्याचं दिसत आहे.

रेल्वे रुळावर तिरंगा फडकावत विद्यार्थ्यांचं आंदोलन

दुसरीकडे जहानाबादमध्ये देखील विद्यार्थ्यांनी एक प्रवासी रेल्वेगाडी थांबवली आणि आंदोलन केलं. यावेळी विद्यार्थ्यांनी रेल्वे रुळावरच तिरंगा फडकावला आणि आरआरबी-एनटीपीसीच्या निकालात घोटाळा झाल्याचा आरोप केला.

एनटीपीसी आणि लेव्हल-१ ची परीक्षा स्थगित

दरम्यान, मागील २ दिवसांपासून रेल्वे परीक्षेच्या निकालात घोटाळ्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर रेल्वे मंत्रालयाने बुधवारी (२६ जानेवारी) एनटीपीसी आणि लेव्हल-१ ची परीक्षा स्थगित केलीय. तसेच एका समितीचं गठण करण्यात आलं. ही समिती उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांशी बोलेल आणि एक अहवाल रेल्वे मंत्रालयाला पाठवणार आहे, अशी माहिती रेल्वेने दिलीय.

हेही वाचा : ट्रेनमध्ये मोबाइलवर मोठ्याने बोलणाऱ्यांवर आणि गाणी ऐकणाऱ्यांवर होणार कारवाई; जाणून घ्या रेल्वेचा नवा नियम

“हिंसक आंदोलकांना आजीवन अयोग्य घोषित करणार”

याआधी देखील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक रूप आलंय. आंदोलक विद्यार्थ्यांनी भीखना पहाडी, कदमकुआं आणि सैदपूर भागात पोलिसांवर दगडफेक केल्याचीही घटना घडलीय. आक्रमक विद्यार्थ्यांनी बिहारमधील अनेक शहांमध्ये रेल्वे वाहतुकीवर परिणाम केलाय. आरामध्ये ट्रेनला आग लावल्याचीही घटना घडलीय. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने हिंसक आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर कारवाईचा इशारा दिलाय. तसेच अशा विद्यार्थ्यांना रेल्वे नोकरीसाठी आजीवन अयोग्य घोषित करणार असल्याचंही म्हटलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Student protest against rrb ntpc railway exam in bihar set fire to train pbs
First published on: 26-01-2022 at 16:02 IST