वाराणसी जिल्हा न्यायालयाने ३१ जानेवारी रोजी ज्ञानवापी परिसरात हिंदू धर्मीय लोक पूजाअर्चा करु शकतात, असा आदेश दिला होता. न्यायालयाच्या या आदेशानंतर वाराणसीतल्या ज्ञानवापी परिसरात ३१ वर्षांनी पूजा आणि प्रार्थना करण्यात आली. ज्ञानवापी परिसरात अनेक वर्षांनंतर घंटा आणि शंखनाद झाला. न्यायालयाच्या निर्देशानुसार हिंदू भाविक मशीद परिसरातील ‘व्यासाचे तळघर’ (व्यास का तेखाना) येथे जाऊन पूजा करू लागले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण पुढे करत मशीद परिसरातील हा भाग गेल्या अनेक वर्षांपासून बंद ठेवण्यात आला होता. परंतु, हे तळघर आता हिंदू भाविकांसाठी खुलं झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अयोध्येत राम मंदिर उभारल्यानंतर आता हिंदू संघटनांनी ज्ञानवापी मशिदीच्या जागी मंदिर बांधलं जावं यासाठीचा न्यायालयीन लढा तीव्र केला आहे. बाबरी मशिदीप्रमाणे ज्ञानवापी मशीद पाडून त्या ठिकाणी मंदिर बांधलं जावं, अशी मागणीदेखील होऊ लागली आहे. भाजपा नेते आणि माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामी हे गेल्या अनेक वर्षांपासून काशी विश्वनाथ मंदिरासाठी कायदेशीर लढाई लढत आहेत. स्वामी हे काशी विश्वनाथ मंदिर मुक्त करण्यासाठी स्थापन केलेल्या संघटनेच्या अध्यक्षपदी होते. परंतु, स्वामी यांना या संघटनेच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं आहे. सुब्रह्मण्यम स्वामी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरतात. यासंदर्भात स्वामी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे.

सुब्रह्मण्यम स्वामी यांनी त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, काशी विश्वनाथ मंदिर मुक्त करण्यासाठी स्थापन केलेल्या संघटनेच्या अध्यक्षपदावरून मला हटवून ही संघटना बरखास्त करण्याचे निर्देश हे नरेंद्र मोदी यांनीच दिले आहेत हे आता उघड झालं आहे. नरेंद्र मोदी यांचा राक्षसी स्वभाव यातून स्पष्ट होतोय. राम मंदिर प्रकरण जेव्हा सर्वोच्च न्यायालयात होतं तेव्हादेखील नरेंद्र मोदी असेच वागले होते.

सुब्रह्मण्यम स्वामींचा पंतप्रधानांना इशारा

ज्ञानवापी मशीद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत आहे. त्यामुळे मोदी यांनी हिंदू संघटनांच्या लढ्याला बळ द्यावं, अशी मागणी हिंदू संघटनांनी केली आहे. दरम्यान, सुब्रह्मण्यम स्वामी यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे एक मागणी केली आहे. तसेच ती मागणी पूर्ण न झाल्यास मोदींविरोधात त्यांच्याच मतदारसंघात मोहीम सुरू होईल, असा इशाराही स्वामी यांनी दिला आहे.

हे ही वाचा >> राम मंदिर प्राणप्रतिष्ठा : BBC च्या वार्तांकनावर ब्रिटनचे खासदार भकडले; म्हणाले, “पक्षपाती..”

सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दोन दिवसांपूर्वी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्ञानवापी क्षेत्राच्या मुक्तीसाठी, मूळ काशी विश्वनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी आणि मशिदीसाठी पर्यायी जमीन देण्यासाठी सक्रीय पाठिंबा दर्शवला तर बरं होईल, अन्यथा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदारसंघात त्यांचा पराभव करण्याची मोहीम सुरू होईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subramanian swamy says narendra modi removed me from kashi vishwanath temple organisation asc