Sunita Williams may Return in 2025 : नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर गेल्या दोन महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. नासासह अमेरिका आणि भारत त्या दोघांच्या पृथ्वीवर येण्याची वाट पाहत आहेत. त्यांना परत आणण्यासाठी नासाकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र अद्याप नासाला यामध्ये यश आलेलं नाही. दरम्यान, एक वाईट बातमी समोर आली आहे. दोन्ही अंतराळवीरांना अजून काही महिने अंतराळातच राहावं लागू शकतं. सुनीता विल्यम्स व बॅरी विल्मोर सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आहेत. बोइंग कंपनीचं ‘स्टारलायनर’ हे अंतराळयान ५ जून रोजी दोन्ही अंतराळवीरांना घेऊन अवकाशात झेपावलं होतं. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून एक किंवा दोन आठवड्यांत ते परततील अशी अपेक्षा नासाने व्यक्त केली होती. मात्र, आता दोन महिने उलटले तरी अद्याप ‘स्टारलायनर’ पृथ्वीवर परतलं नाही. स्टारलायनर या अंतराळयानात काही दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत. हीलियम लीकेज व थ्रस्टरमध्ये (प्रणोदन प्रणाली) बिघाड झाल्यामुळे अंतराळवीरांचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकला नाही. अंतराळ यानाच्या प्रणोदन प्रणालीमध्ये (प्रोपल्शन सिस्टीम) निर्माण झालेल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी अधिक वेळ हवा आहे. नासा दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. त्यापैकी पहिला सोपा पर्याय अंमलात आणल्यास दोन्ही अंतराळवीर २०२५ मध्ये पृथ्वीवर परततील. या योजनेत एलॉन मस्क यांची स्पेसएक्स ही कंपनी देखील सहभागी होणार आहे. अंतराळवीर पृथ्वीवर कधी परतणार? दरम्यान, कमर्शियल क्रू प्रोग्रामचे संचालक स्टीव्ह स्टिच म्हणाले, विल्मोर व सुनीता या दोघांना परत आणण्यासाठी आम्ही इतर काही पर्यायांचा विचार करत आहोत. सध्या आम्ही जी योजना आखली आहे, त्यानुसार दोन्ही अंतराळवीर २०२५ च्या सुरुवातीला पृथ्वीवर परततील. या योजनेत आम्ही स्पेसएक्स या कंपनीलाही सहभागी करून घेतलं आहे. नासाने मिशन क्रू ९ हे हाती घेतलं आहे. या मोहिमेंतर्गत नासाचं अवकाशयान अवाकाशात झेपावणार आहे. याच अवकाशयानाद्वारे दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणता येईल. याद्वारे २०२५ पर्यंत दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर येतील. हे ही वाचा >> राकेश शर्मांनंतर तब्बल ४० वर्षांनी आता आणखी एक भारतीय अवकाशात प्रवास करणार, वाचा सविस्तर… अवकाशयानाची दिशा किंवा उंची यामध्ये आवश्यक सुधारणा करणारं यंत्र म्हणजेच थ्रस्टरमध्ये बिघाड झाला आहे. अंतराळ स्थानकावर थ्रस्टर बंद झाले. एक थ्रस्टर सोडून इतर सर्व पुन्हा सुरू करण्यात आले आणि नंतर करण्यात आलेल्या चाचणीमध्ये ते कार्यरत झाले, असे नासाने सांगितले. एक सदोष थ्रस्टर बंद करण्यात आला आहे. परतीची तारीख निश्चित करण्यापूर्वी थ्रस्टरच्या अधिक चाचण्या केल्या जातील, असे स्टिच यांनी सांगितलं आहे.