Supreme Court on Air India Plane Crash Report: १२ जून रोजी अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण घेतलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला होता. या अपघाताच्या कारणांची तपासणी करून एएआयबीने जुलै महिन्यात प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला. सदर अहवालात पायलटची चूक असल्याचे ध्वनित झाले, असा आरोप करण्यात येत आहे. या अहवालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने अहवालावर गंभीर चिंता व्यक्त केली. तसेच पायलटकडे बोट दाखवणे दुर्दैवी असल्याचे म्हटले.
सर्वोच्च न्यायालयाने अहवालातील काही बाबींना बेजबाबदार ठरविले. तसेच अपघाताची स्वतंत्र, निष्पक्ष आणि जलद चौकशी केली जावी, असे निर्देश देणारी नोटीस केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहूतक महासंचालक (DGCA) यांना बजावली.
सेफ्टी मॅटर्स फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने प्राथमिक तपास अहवाल आणि त्या अनुषंगाने माध्यमात छापून आलेल्या बातम्यांवर नाराजी व्यक्त केली.
पायलटने आत्महत्या केल्याचे वृत्त संतापजनक
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हटले की, अधिकृत अहवाल प्रसिद्ध होण्यापूर्वीच वॉल स्ट्रीट जर्नल या आंतरराष्ट्रीय दैनिकात पायलटची चूक असल्याची बातमी छापली गेली. तसेच पायलटने आत्महत्या केल्याचेही वृत्त काहिंनी दिले. जर आत्महत्याच करायची असती, तर त्यासाठी इतर १०० पर्याय होते. अशा बिनबुडाच्या वृत्तामुळे पायलटची चूक असावी, अशी दिशाभूल करणारी माहिती वेगाने पसरली. प्रत्यक्षात मात्र पायलट फार अनुभवी होते.
वकील प्रशांत भूषण यांच्या युक्तीवादानंतर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. हे खूपच बेजबाबदार आणि दुर्दैवी होते. अशा प्रकरणात गोपनियता बाळगणे हे सर्वात महत्त्वाचे आहे, असे खंडपीठाने म्हटले
“उद्या कुणीही बेजबाबदारपणे म्हटले की, पायलट अ किंवा ब ची चूक आहे, तर त्यांच्या कुटुंबियांना याचा त्रास भोगावा लागू शकतो. जर अंतिम अहवालात पायलटची चूक नसल्याचे निष्पन्न झाले तर काय होईल?”, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने प्रतिपक्षाला विचारला. तसेच तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत यातील माहिती गोपनिय ठेवली जावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
मृत पायलट सबरवाल यांच्या वडिलांनी घेतला होता आक्षेप
एअर इंडिया विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल अपूर्ण, दिशाभूल करणारा आणि विसंगत असल्याचा आरोप मृत पायलट सुमित सभरवालचे ९१ वर्षीय वडील पुष्कराज सभरवाल यांनी केला आहे. या अहवालामुळे माझ्या मुलाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची नव्याने औपचारिक चौकशी करावी, अशी मागणी सभरवाल यांनी विमान अपघात चौकशी ब्युरोकडे (एएआयबी) लेखी पत्राद्वारे केली आहे.
अहमदाबाद विमानतळावर १२ जून २०२५ रोजी एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात विमानातील २४१, तर अन्य १९ जणांचा मृत्यू झाला होता. जुलै महिन्यात एएआयबी अर्थात विमान अपघात चौकशी ब्युरोने (एअरक्राफ्ट ॲक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो) प्राथमिक अहवाल प्रसिध्द केला होता.