नवी दिल्ली :बिहारमधील महाराजगंजचे माजी खासदार प्रभुनाथ सिंह यांना १९९५ च्या दुहेरी खून प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बिहारच्या सारण जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी आपल्या पक्षाला मत न दिल्याच्या रागातून प्रभुनाथ सिंह यांनी मतदान करून घरी जाणाऱ्या काही मतदारांवर गोळीबार केला होता. त्यामध्ये दरोगा राय आणि राजेंद्र राय या दोघांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा >>> ‘आमच्या ‘कोम’ समुदायाला वाचवा’, मणिपूरच्या हिंसाचारावरून मेरी कोम यांचे अमित शहा यांना पत्र

प्रभुनाथ सिंह आणि बिहार सरकारने दोन्ही मृतांच्या कुटुंबीयांना स्वतंत्रपणे प्रत्येकी १० लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी असे आदेश न्या. संजय किशन कौल, न्या. अभय ओक आणि न्या. विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने दिले. तसेच या गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीला पाच लाख रुपये देण्याचेही आदेश देण्यात आले. या प्रकरणाचा निकाल देताना ‘असा प्रकार यापूर्वी कधीही पाहिला नाही’ अशी टिप्पणी खंडपीठाने केली. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने १८ ऑगस्टला बिहारमधील सत्र न्यायालय आणि पाटणा उच्च न्यायालयाचा निकाल बाजूला ठेवून प्रभूनाथ सिंह यांना दुहेरी खून प्रकरणात दोषी ठरवले होते. आपल्या फौजदारी न्यायालयीन प्रणालीचा हा अतिशय वेदनादायी भाग आहे. खुनाच्या आरोपातून सुटण्यासाठी प्रभुनाथ सिंह यांनी पुरावे नष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली याबद्दल जराही शंका नाही असे निरीक्षण न्यायालयाने सुनावणीदरम्यान नोंदवले होते.