Tamilnadu Actor Vijay Rally Stampede: दाक्षिणात्य अभिनेता आणि मागच्या वर्षी राजकारणात उतरलेला थलपती विजय हा तमिळनाडूमधील प्रसिद्ध लोकांपैकी एक आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी असंख्य लोकांची गर्दी जमा होते, हे मागच्या वर्षी त्याच्या पहिल्याच सभेत दिसून आले होते. २७ ऑक्टोबर २०२४ रोजी जेव्हा त्याने ‘तमिळगा वेत्री कळघम’ पक्षाची पहिली सभा घेतली तेव्हा त्या सभेला झालेली गर्दी देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. करूर जिल्ह्यात शनिवारी (२७ सप्टेंबर) थलपती विजयने पक्षातर्फे रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी ३८ हून अधिक लोकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. चेंगराचेंगरी नेमकी कशी झाली? याबाबत आता प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधताना नंद कुमार नावाच्या प्रत्यक्षदर्शीने शनिवारी रात्री घडलेला प्रसंग कथन केला. प्रमाणापेक्षा अधिक लोकांची गर्दी जमा झाल्यामुळे गर्दीला नियंत्रित करण्यासाठी काहीही करता आले नाही, असे त्यांनी म्हटले. करूर जिल्ह्यातील रॅलीत आतापर्यंत ३८ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ज्यात महिला आणि मुलांचा समावेश अधिक आहे.
थलपती विजय ६ तास उशीरा आला
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, थलपती विजय रॅलीच्या ठिकाणी दुपारी येणे अपेक्षित होते. मात्र तिथे तो सहा तासांनी उशीरा पोहोचला. नंद कुमार म्हणाले, “कुणाची चूक आहे, हे सांगणे कठीण आहे. विजय वेळेवर येईल, यासाठी लोक जमा झाले होते. अनेकजण मुलांबाळांसह आले होते. ते भुकेलेले होते, कठीण परिस्थितीचा सामना करत ते घटनास्थळी उभे होते. विजय सारख्या स्टार अभिनेत्याला पाहण्यासाठी प्रत्येकजण तिथे आला. पण जे घडले ते अतिशय दुःखद होते.”
आणखी एक प्रत्यक्षदर्शी सुरियाने सांगितले की, चेंगराचेंगरी झाल्यानंतरही गर्दी पांगली नव्हती. लोकांना उभे राहायलाही रस्त्यावर जागा नव्हती. रुग्णवाहिकेला वाट मिळाली नाही, त्यामुळे बचाव कार्य धीम्या गतीने सुरू होते.
नमक्कल येथून आलेल्या पी. शिवशंकरी या महिलेने सांगितले की, तिच्या शेजारी उभी असलेली महिला कोसळली तरी गर्दी पुढे सरकत होती. मी मदतीसाठी हाका मारल्या पण कुणीही बाजूला व्हायला तयार नव्हते. लोक एकमेकांच्या अंगावर पडत होते. आम्हाला श्वास घ्यायलाही अडचण निर्माण झाली.
माझ्या डोळ्यासमोर माझी मुलगी गेली
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या प्रतिक्रियेत एका पित्याने हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग सांगितला. तो म्हणाला, मी माझ्या १२ वर्षांच्या मुलीसह थलपती विजयला पाहायला आलो होतो. गर्दीमध्ये ती बेशूद्ध पडली. मला वाटले ती बरी होईल. पण ती माझ्या डोळ्यादेखत हे जग सोडून गेली.
रॅलीत नेमके काय झाले?
‘वेलिचम वेलीयेरू’ (प्रकाश उजळू द्या) या नावाने थलपती विजयच्या पक्षाने प्रचार रॅली काढली होती. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या रॅलीसाठी १०,००० लोकांना परवानगी देण्यात आली होती. त्यासाठी ५०० पोलीस तैनात करण्यात आले होते. मात्र सायंकाळपर्यंत हजारो लोक घटनास्थळी जमा झाले. चेंगराचेंगरी झाली तेव्हा सुमारे ३०,००० लोक उपस्थित होते, असे शासकीय यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तमिळनाडू सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय तपास आयोग नेमला आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश जस्टिस अरुणा जगदीसन या आयोगाच्या अध्यक्ष असतील.