बॉलिवूड अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला काल रात्री मुंबई महापालिकेने सक्तीने क्वारंटाइन केलं.  त्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपली भूमिका मांडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात चौकशी करुन बिहार पोलीस फक्त कर्तव्य बजावत आहेत. यात काहीही राजकीय नाहीय असे नितीश कुमार सोमवारी म्हणाले.

“बिहार पोलीस पथकाचे नेतृत्व करण्यासाठी आयपीएस अधिकारी विनय तिवारी रविवारी मुंबईत दाखल झाले. पण रात्री ११ वाजता मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांना सक्तीने क्वारंटाइन केलं” असा आरोप बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी टि्वट करुन केला. त्यानंतर आज नितीश कुमार यांनी यावर आपली भूमिका मांडली.

आणखी वाचा- सुशांत मृत्यू प्रकरण : मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलेले १० महत्त्वाचे मुद्दे

“विनय तिवारी यांच्यासोबत जे काही घडलं, ते योग्य नाही. बिहार पोलीस त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. आमचे डीजीपी त्यांच्याबरोबर बोलतील” असे नितीश कुमार म्हणाले.

आणखी वाचा- सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला सक्तीने केलं क्वारंटाइन

मुंबई महापालिकेची भूमिका

बिहारमधून आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय नियमाला धरुन आहे असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. ते देशांतर्गत प्रवासी असल्याने, त्यांना कोविड १९ संदर्भातील राज्य शासनाच्या नियमावलीनुसार गृह अलगीकरण (होम क्वारंटाइन) करणे आवश्यक होते असे महापालिकेने म्हटले आहे. आमच्या पथकाने ते थांबलेल्या विश्रामगृहावर पोहोचून सर्व प्रक्रिया समजावून सांगितली असे महापालिकेने म्हटले आहे.

आणखी वाचा- सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने- अनिल देशमुख

देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या व्‍यक्तिंसाठी नियमावली ठरवून देण्यात आली असून त्यामध्ये गृह अलगीकरणाचा देखील समावेश आहे, त्याची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. राज्य शासनाच्या नियमावलीनुसार, गृह अलगीकरणातून सूट मिळण्यासाठी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सक्षम प्राधिकारी यांच्याकडे नियमावलीनुसार अर्ज करणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushant singh rajput death case nitish kumar condemns quarantine of bihar officer dmp