Punjab Police Crime : पंजाब पोलीस दलातील माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा आणि त्यांची पत्नी तथा माजी कॅबिनेट मंत्री रजिया सुलताना यांचा मुलगा अकील अख्तर (३५) याचा पंचकुला येथील निवासस्थानी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचं आढळून आल्याची घटना घडली. त्यामुळे पंजाबमध्ये मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.

या प्रकरणात कुटुंबाने अकीलचा मृत्यू हा ड्रग्जच्या अतिसेवनामुळे झाल्याचा दावा केला होता. मात्र, आता प्रकरणात माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा आणि मुस्तफाची पत्नी रझिया सुलतानासह आणखी चार जणांवर कट रचल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त जनसत्ताने दिलं आहे.

या प्रकरणात दाखल एफआयआरनुसार अख्तर यांचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत आढळून आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितलं की, “मुस्तफा, सुलताना आणि अख्तरच्या बहिणी आणि पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचकुला पोलीस डीसीपी यांच्या म्हणण्यानुसार, “पंचकुला येथील सेक्टर ४, एमडीसी येथील रहिवासी अख्तर १६ ऑक्टोबर रोजी त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. कुटुंबाने पोलिसांना कळवलं आणि त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. सुरुवातीला कोणताही गैरप्रकार झाल्याचा संशय नव्हता आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कुटुंबाकडे सोपवण्यात आला होता.”

अख्तरने मृत्यूपूर्वी बनवले होते काही व्हिडीओ

पंचकुला पोलीस डीसीपी यांनी म्हटलं की, “अख्तरने त्याच्या मृत्यूपूर्वी बनवलेल्या काही सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओंमध्ये अख्तरने वैयक्तिक वाद आणि त्याच्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला होता. यातच १७ ऑक्टोबर रोजी एका व्यक्तीने या प्रकरणात तक्रार नोंदवत या घटनेमागे कट असल्याचा आरोप केला आहे.”

“तक्रारी आणि सोशल मीडिया पोस्टमधील मजकूर लक्षात घेता भारतीय दंड संहितेच्या कलम १०३ (१), ६१ अंतर्गत पंचकुला पोलीस स्टेशनमध्ये २० ऑक्टोबर रोजी एफआयआर नोंदवण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. एसआयटी या प्रकरणाच्या सर्व बाबींचा सखोल तपास करेल”, असं डीसीपींनी म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणाची त्वरित चौकशी करण्याची मागणी करत तक्रारदाराने आरोप केला आहे की मृत व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबात असंतोष निर्माण झाला होता. तसेच तक्रारदाराने असंही म्हटलं आहे की अख्तरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्याने कौटुंबिक बाबींशी संबंधित गंभीर आरोप केले होते आणि त्याने त्याच्या जीवाची भीती व्यक्त केली होती.