Swami Chaitanyananda : दिल्लीमधील स्वयंघोषित बाबा स्वामी चैतन्यानंद सरस्वतीच्या विरोधात आश्रमातील १७ विद्यार्थिनींनी गैरवर्तन केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. एवढंच नाही तर गुन्हा दाखल झाल्यानंतर आश्रमातील अवैध प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. चैतन्यानंद सरस्वती हा विद्यार्थिनींशी गैरवर्तन करत होता. या प्रकरणात पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वामी चैतन्यानंद हा काही दिवस फरार झाला होता. मात्र, दिल्ली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आग्रा येथून चैतन्यानंदला बेड्या ठोकल्या. त्यानंतर न्यायालयात दाखल करण्यात आलं असता न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलीस कसून चौकशी करत असून दररोज अनेक खुलासे समोर येत आहेत. आता चैतन्यानंदबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या प्रकरणाचा तपास जसा पुढे जात आहे, तशी चैतन्यनंदविरुद्ध नवीन माहिती समोर येत आहे. पोलिसांना त्याच्या मोबाईल फोनमध्ये महिलांचे फोटो आणि अश्लील चॅट्स आढळून आल्याचं सांगितलं जात असून त्याचा फोन पोलिसांनी जप्त केला आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

वृत्तानुसार, चैतन्यनंद हा महिलांना विविध आश्वासने देत होता, वेगवेगळे आमिष दाखवून फसवणूक करत असल्याचं उघड झालं आहे. एवढंच नाही तर चैतन्यानंदने अनेक महिला सदस्यांसोबतचे फोटो आणि अनेक महिलांच्या सोशल मीडिया प्रोफाइलचे स्क्रीनशॉट देखील फोनमध्ये ठेवले होते, असं पोलीस सूत्रांनी सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे. तसेच या प्रकरणात पोलिसांनी चैतन्यानंदच्या दोन महिला साथीदारांनाही ताब्यात घेत त्यांची चौकशी केली जात आहे. चैतन्यानंद हा पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याचीही चर्चा आहे.

स्वामी चैतन्यानंद पोलिसांना कसा चकवा द्यायचा?

स्वामी चैतन्यानंद सरस्वतीवर गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो पोलिसांना चकवा देत होता. स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार असताना पोलिसांना नेमकं कसा चकवा द्यायचा? याबाबत माहिती समोर आली आहे. स्वामी चैतन्यानंद सरस्वती हा नाव बदलून हॉटेलमध्ये राहायचा, तसेच फरार असल्याच्या काळात तब्बल १३ हॉटेल्स बदलले होते. पण तरीही तो पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच.