गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडू भाजपामधील घडामोडी मोठा चर्चेचा विषय ठरल्या आहेत. एप्रिल महिन्यात तामिळनाडू भाजपाचे प्रदेश अध्यक्ष के अन्नामलाई यांना पदावरून हटवून त्यांच्याजागी पक्षानं नैनार नागेंद्रन यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे तामिळनाडू भाजपामध्ये अंतर्गत कलह निर्माण झाल्याची चर्चा चालू आहे. त्यामुळे केंद्रीय भाजपाची डोकेदुखी वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे. पक्षानं पदावरून हटवल्यामुळे अन्नामलाई स्वतंत्र पक्षाची स्थापना करणार असल्याचीही जोरदार चर्चा असून त्यासंदर्भातदेखील अन्नामलाई यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले के. अन्नामलाई?

तामिळनाडू भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी कोइम्बतूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रसारमाध्यमांनी सध्या चालू असलेल्या नव्या पक्ष स्थापनेच्या चर्चांविषयी त्यांना विचारणा केली असता त्यांनी त्याबाबत सविस्तर भूमिका मांडली. “मी नवीन पक्ष कसा काढू शकतो? मला माझी पोहोच चांगलीच माहिती आहे”, असं ते म्हणाले. त्यामुळे नवीन पक्ष स्थापन करण्याची शक्यता अन्नामलाई यांनी सध्या तरी स्पष्टपणे फेटाळून लावली आहे.

“मी हवं तेव्हा भाजपा सोडून जाऊ शकतो”

दरम्यान, ए्प्रिल महिन्यात पक्षानं पदावरून काढल्यानंतरदेखील अन्नामलाई यांनी त्यासंदर्भात कोणतंही मोठं पाऊल उचललं नसल्यामुळे त्यांना बळजबरीने पक्षात थांबवून ठेवल्याचेही तर्क लावले जाऊ लागले. मात्र, हे दावे अन्नामलाई यांनी स्पष्टपणे फेटाळून लावले. “जर मला वाटलं, तर मी पक्षात थांबेन. जर मला वाटलं तर मी पक्ष सोडून देईन आणि शेती करेन. जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा या सर्व गोष्टींवर मी सविस्तर बोलेन. कुणीही बंदूक रोखून एखाद्याला पक्षामध्ये थांबवून ठेवू शकत नाही. राजकारण ही कुणाच्याही जबरदस्तीने नसून स्वेच्छेने करण्याची गोष्ट आहे. आम्ही खिशातून पैसे खर्च करून राजकारण करत आहोत”, असं अन्नामलाई यावेळी म्हणाले.

तामिळनाडू भाजपात नेमकं चाललंय काय?

अन्नामलाई यांना पदावरून काढल्यापासून तामिळनाडू भाजपामध्ये सारंकाही आलबेल चाललेलं नसल्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. पण यासंदर्भात पक्षाकडून कोणतीही जाहीर वाच्यता केली जात नसल्यामुळे त्याबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. यासंदर्भात अन्नामलाई यांना प्रश्न विचारला असता त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आपण योग्य व्यक्ती नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.

AIADMK शी युती वादाचं कारण?

दरम्यान, तामिळनाडूमध्ये भाजपानं एआयएडीएमकेशी केलेली युती आपल्याला हव्या त्या अटींवर झाली नसल्याची भूमिका अन्नामलाई यांनी पक्षश्रेष्ठींकडे मांडल्याचं सांगितलं जातं. शिवाय, एआयएडीएमकेचे सरचिटणीस इडाप्पडी पसानीस्वामी यांनीदेखील भाजपाशी युतीसाठी अन्नामलाई यांना हटवण्याची पूर्वअट घातली होती, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अन्नामलाई ‘योग्य वेळ’ आल्यानंतर नेमकं काय बोलणार? यावरून सध्या तर्क-वितर्क लावले जात आहेत.