तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील बोधन शहरात शिवाजी पुतळ्याच्या उभारणीवरून दोन राजकीय गटातील सदस्यांमध्ये झालेल्या भांडणानंतर कलम १४४ लागू करण्यात आले. भाजपाचे स्थानिक खासदार अरविंद धर्मपुरी म्हणाले की, महाराष्ट्राला लागून असलेल्या बोधन शहराच्या आंबेडकर चौकात छत्रपती शिवाजींचा पुतळा उभारण्याची योजना होती.

पुतळा बसवण्यास विरोध करणाऱ्या एआयएमआयएम आणि टीआरएस कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. एआयएमआयएम आणि टीआरएस समर्थकांनी भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांना विरोध केल्याने प्रकरणाला हिंसक वळण लागले.

“तीच कुटिल मानसिकता. सगळं उद्ध्वस्त करण्याची. एमआयएम आणि टीआरएसचे गुंड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण उधळण्याचा प्रयत्न करत आहेत आणि बोधन आंबेडकर चौरस्ता येथे उभारलेल्या पुतळ्याची नासधूस करत आहेत,” असे ट्विट खासदार अरविंद धर्मपुरी यांनी केले.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, परिसरात तणाव आणखी वाढू नये म्हणून कलम १४४ लागू करण्यात आले आहे. हाणामारीत सहभागी दोन्ही गटांशी बोलून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.